जिल्ह्यातील मंजूर, प्रस्तावित लोहखदाणी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:23 IST2021-07-22T04:23:18+5:302021-07-22T04:23:18+5:30
मे. गोपानी आयर्न ॲन्ड पॉवर इंडिया प्रा. लि., मुंबई यांना दमकोंडवाही व सुरजागड बुरिया हिल येथील अनुक्रमे क्षेत्र २९५ ...

जिल्ह्यातील मंजूर, प्रस्तावित लोहखदाणी रद्द करा
मे. गोपानी आयर्न ॲन्ड पॉवर इंडिया प्रा. लि., मुंबई यांना दमकोंडवाही व सुरजागड बुरिया हिल येथील अनुक्रमे क्षेत्र २९५ व १५३ हेक्टर जागेत दिलेली मंजुरी नियम डावलून दिली आहे. पुरसलगोंदी व गर्देवाडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकांनी नियमबाह्यपणे ठराव लिहून दिला. तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी ३ मे २०१० रोजी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप करीत संबंधित ग्रामसेवक, तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन उपवनसंरक्षक, भामरागड यांना बडतर्फ करून मंजुरीची प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
याशिवाय कोरची तालुक्यातील टिपागड अभयारण्य आणि आगरी, मसेली व झेंडेपार येथे प्रस्तावित असलेल्या लोह खाणी स्थानिक लोकांच्या विरोधानंतरही मंजुरीची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून सुरू आहे. ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत यापूर्वीही अनेक वेळा मागणी करूनही शासनाने दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.
या निवेदनावर जिल्हा परिषदेचे सदस्य सैनू मासू गोटा, पंचायत समितीचे सदस्य शीला सैनू गोटा, शेकापचे रामदास जराते, जयश्री वेळदा व इतर गावकऱ्यांच्या सह्या आहेत.