कॅनडाची स्वयंसेवी संस्था पुरविणार रोजगार
By Admin | Updated: February 26, 2017 01:50 IST2017-02-26T01:50:27+5:302017-02-26T01:50:27+5:30
कॅनडा येथील युनायटेड स्टील वर्कर फाऊंडेशनच्या वतीने कमलापूर परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

कॅनडाची स्वयंसेवी संस्था पुरविणार रोजगार
कोडसेलगुडम गावाला भेट : वनांवर आधारित कुटिरोद्योग सुरू करणार
कमलापूर : कॅनडा येथील युनायटेड स्टील वर्कर फाऊंडेशनच्या वतीने कमलापूर परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या अनुषंगाने संस्थेचे संचालक डग अलथाईस व पदाधिकाऱ्यांनी कोडसेलगुडमला नुकतीच भेट दिली.
कोडसेलगुडम या गावातील सांबया करपेत, बापू आत्राम, सत्यनारायण कोडापे यांनी बिरसा मुंडा युवक मंडळ स्थापन केले. या मंडळाच्या वतीने या भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जात होत्या. त्याचबरोबर आदिवासी व बहुजन समाजाच्या नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचेही काम केले होते. त्यांचे काम बघण्यासाठी कॅनडा येथील युनायटेड स्टिल वर्कर फाऊंडेशनचे संचालक डग अलथाईस, एसएफएच फाऊंडेशनचे बौब, मंजीत सिद्धू, डग शिंगर, रॉबिन सैनी, दादाराव डोंगरे, दिल्लीचे राजीव शर्मा, शृती राणे, जोगेंद्र सोंडुले, जोगेंद्र त्रिपाठी यांनी कोडसेलगुडम या गावाला भेट दिली.
गावकऱ्यांनी विदेशी पाहुण्यांचे पारंपरिकरितीने स्वागत केले. कोळसेलगुडम येथील बिरसा मुंडा चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कोडसेलगुडम या गावाने दारूबंदीचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे डग सिंगर यांनी स्वागत केले. दारूबंदीची चळवळ संपूर्ण कमलापूर परिसरात राबविण्यासाठी आपली संस्था मदत करेल, असे आश्वासन दिले. त्याचबरोबर सभेत उपस्थित असलेल्या नागरिकांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
स्थानिक मजुरांकडे जॉबकार्ड असूनही रोजगार नसल्याची बाब स्थानिक नागरिकांनी लक्षात आणून दिली असता, वनावर आधारित लहान उद्योग उभारून रोजगार पुरविल्या जाईल, त्याचबरोबर महिलांना सिलाई मशीन उपलब्ध करून देऊन घरबसल्यास रोजगार दिला जाईल, असे आश्वासन दिले.
प्रास्ताविक सांबया करपेत, संचालन बापू आत्राम तर आभार संतोष सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी मलय्या साकटी, स्नेहदीप आत्राम, शंकर कुसराम, श्रीनिवास पेंदाम, गणेश सिडाम, निलीमा करपेत, सीताबाई आलाम, सुलभा सिडाम, सुशिला आलाम, सुजाता सिडाम, शंकर आत्राम, संतोष पोरतेट, बंडू सिडाम यांच्यासह कोडसेलगुडम येथील नागरिकांनी सहकार्य केले. (वार्ताहर)