आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:45 IST2017-05-15T01:45:18+5:302017-05-15T01:45:18+5:30

राज्यातील शासकीय आश्रमशाळांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून आश्रमशाळा कायापालट अभियान सुरू केले आहे.

Campaign to improve the quality of ashram schools | आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अभियान

आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अभियान

स्वच्छतेवर विशेष भर : कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील शासकीय आश्रमशाळांची स्थिती सुधारण्यासाठी राज्य शासनाने यावर्षीपासून आश्रमशाळा कायापालट अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत आश्रमशाळांमधील स्वच्छतागृहे, स्नानगृहांची दुरुस्ती आणि गरजेनुसार नवीन बांधकाम करण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी संबंधितांना प्रशिक्षणही दिले जात आहे. केंद्र सरकारने हाती घेतलेल्या स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.
राज्यभरात सुमारे ५५० शासकीय आश्रमशाळा आहेत. काही महिन्यांपूर्वी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शासकीय महिला अधिकाऱ्यांच्या समित्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील आश्रमशाळांची पाहणी केली होती. या समितीच्या अहवालातून आश्रमशाळांची बिकट स्थिती स्पष्ट झाली. वसतिगृह, त्यातील प्रसाधनगृहाच्या दरवाजाला कड्या नाहीत. काही ठिकाणी शौचालय व स्नानगृहाला छप्परही नाही. काही शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना नदीवर आंघोळीसाठी जावे लागते. शौचालय व स्नानगृहांची स्वच्छता होत नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरते. यामुळे विद्यार्थी त्यांचा वापर करणेही टाळत आहेत. या स्थितीत शासनाने आश्रमशाळा कायापालट अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत शाळांमधील स्वच्छतागृहे व स्नानगृहांची दुरुस्ती आणि आवश्यकता भासल्यास नवीन बांधकाम करण्याची तयारी करण्यात आली आहे. शाळा सुरू झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक प्रत्येक शाळेतील कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतील. त्यात स्वच्छतेचे महत्त्व, योग्य सवयी, हात धुणे याबद्दल माहिती दिली जाईल. आश्रमशाळांच्या धर्तीवर वसतिगृहातही या पद्धतीने सोयीसुविधा विकसित करण्यात येणार आहेत. आश्रमशाळा कायापालट अभियानाच्या प्रगतीचा साप्ताहिक आढावा घेतला जाईल. संबंधित आश्रमशाळांची सध्याची पाणीपुरवठा व सुविधांची सद्य:स्थिती व छायाचित्रासह माहिती द्यावी लागणार आहे.
शासकीय आश्रमशाळांमध्ये उन्हाळी सुटीत विशेष दुरुस्तीची कामे करताना पाणीपुरवठा व स्वच्छतेशी निगडित सुविधा विहित मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कायापालट अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर पारितोषिक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्वच्छतागृह व स्नानगृहांची होणार दुरूस्ती
स्वच्छ भारत, स्वच्छ शाळा हा कार्यक्रमांतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणे, त्या माध्यमातून स्वच्छतेचा प्रसार व प्रचार करणे व आरोग्यमान उंचावणे या उद्देशाने ‘वॉश’ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. वॉश कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शासकीय आश्रमशाळांमधील स्वच्छतागृहे, स्नानगृहांची दुरुस्ती, गरजेनुसार स्वच्छतागृहे व स्नानगृहांसह हात धुण्यासाठी जागा व्यवस्था (हॅण्ड वॉश स्टेशन) बांधणी यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे. कार्यक्रम राबविण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने निवड केलेल्या मुख्य संसाधन संस्था व आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांमधून २०० प्रशिक्षक तयार करण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत कमी खर्चाची कामे हाती घेऊन ती स्थानिक पातळीवर पूर्ण करण्यात येणार आहेत. शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली ही कामे करण्यात येतील.

प्रभावी अंमलबजावणीची गरज
आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शासन अनेक प्रयत्न करीत आहे. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या प्रमाणेच कायापालट अभियानही फार्स ठरू नये, यासाठी प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.

Web Title: Campaign to improve the quality of ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.