एक हजार क्विंटल धान खरेदी
By Admin | Updated: December 27, 2014 01:45 IST2014-12-27T01:45:35+5:302014-12-27T01:45:35+5:30
धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन गुरूवारपासून सिरोंचा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.

एक हजार क्विंटल धान खरेदी
सिरोंचा : धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन गुरूवारपासून सिरोंचा येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सिरोंचा येथील धान खरेदी केंद्रावर पहिल्याच दिवशी एक हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
सिरोंचा तालुक्यात अंकिसा, वडधम, येथेही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतू अमरावती, रोमपल्ली येथील धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या परिसरात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. आदिवासी विकास महामंडळ नाशिक उपप्रादेशिक कार्यालय अहेरी अंतर्गत सिरोंचा तालुक्यात आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्र योजनेंतर्गत हलक्या प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ३६० तर जड प्रतीच्या धानाला प्रती क्विंटल १ हजार ४०० रूपये दर ठेवण्यात आला आहे.
सिरोंचा धान खरेदी केंद्रावर १ हजार क्विंटल धानाची आवक झाली. अशी माहिती संस्थेचे सचिव सुंंकरी राजन्ना यांनी दिली आहे. प्रत्येक हंगामात बारदानाचा तुटवडा असतो. परंतु यावेळी सिरोंचा केंद्रावर दोन हजार च्या आसपास बारदाना पाठविण्यात आला आहे. आणखी पाच हजार बारदान्याची आवश्यकता असल्याचे सचिवांनी सांगितले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात धान खरेदी केली जात असून धानाचे पोते परिसरातील गोदामात साठवून ठेवण्याची व्यवस्था केली जात आहे.
सिरोंचा तालुक्यातील खासगी व्यापाऱ्यांनीही धान खरेदी सुरू केली असून धानाला १ हजार १०० रूपये प्रती क्विंटल भाव देत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. खासगी व्यापारी शेतकऱ्यांना नगद स्वरूपात रक्कम देत असल्याने अनेक शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करीत आहेत. परंतु सिरोंचा, अंकिसा व वडधम येथे धान खरेदीला सुरूवात झाली आहे. (शहर प्रतिनिधी)