खोलीकरण करून नदीत उभारला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:28 IST2018-02-03T00:26:11+5:302018-02-03T00:28:01+5:30

खोलीकरण करून नदीत उभारला बंधारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली असून बोरमाळा नदी घाटावर पाणी टाकी उभारण्यात आली आहे. मात्र नदीची पाणी पातळी खालावल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून शहरात अत्यल्प पाणी पुरवठा होत होता. पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेला गेल्याने अनेक कुटुंबांना नळाचे पाणी मिळत नव्हते. याबाबीची दखल घेत नवे पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांनी नदी पात्रात जाऊन पाहणी केली व पाणी टंचाईची समस्या मार्गी लावली.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेने गेला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. याची दखल घेत पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांनी न.प.कर्मचाऱ्यांसह नदी पात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी नदीचे पात्र कोरडे झाल्याचे आढळून आले. तत्काळ पोकलँड मशीन बोलावून नदी पात्रातील इन्टेक वेलजवळ खोलीकरण करण्यात आले. तसेच सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधण्यात आला. यामुळे नदी पात्रात पाणी पातळी वाढली असल्याने शहराला आता सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती वाघरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नदी पात्रात पाहणी करताना नगरसेवक भुपेश कुळमेथे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सोनटक्के व इतर कर्मचारी उपस्थित होते. उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवणार नाही. याची काळजी घेण्याचे निर्देश सभापती वाघरे यांनी त्यांना दिले.