अटी व शर्तींच्या अधीन धावणार बैल
By Admin | Updated: December 6, 2014 01:35 IST2014-12-06T01:35:22+5:302014-12-06T01:35:22+5:30
ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे.

अटी व शर्तींच्या अधीन धावणार बैल
देसाईगंज : ग्रामीण भागातील उत्सव मानला जाणाऱ्या बैलांच्या शर्यतीना पूर्ववत केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटी व शर्ती लादून मंजुरी देण्याचे ठरविले आहे. या निर्णयामुळे झाडीपट्टीतील पट शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा व तामिळनाडू या राज्यांमधील ग्रामीण भागात बैलांच्या शर्यती मोठ्या प्रमाणात लावण्यात येतात. मात्र पशुप्रेमींनी बैलांना इजा होत असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. याला अनुसरून केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने बैलांच्या शर्यतींना पूर्णपणे बंदी आणली होती़ यामुळे गावात होणाऱ्या शर्यतीच्या उत्सवावर विरजन पडले. मात्र विविध अटी व शर्ती ठेऊन पर्यावरण विभागाने या शर्यती पून्हा होणार असल्याचे जाहीर केले़ अटी व शर्ती जाहीर केल्या नसल्या तरी बैलांना ईजा होणार नाही, बैलांवर जुगार लावता येणार नाही आदी अटींचा समावेश राहू शकतो. कोणत्याही प्रकारचा व्यापारी दृिष्टकोन न ठेवता बैलांच्या शर्यती घेण्यात याव्या, असे पर्यावरणवाद्यांंना देखील वाटते़ मात्र महाराष्ट्रातील शंकरपटांना जुगाराचे रूप आल्यामुळे या अटी व शर्ती कितपत पाळल्या जातात, हे येणारा काळच ठरविणार आहे.
मागील कित्येक शतकांपासून ग्रामीण भागात बैलांच्या शंकरपटांची परंपरा जोपासली जात आहे. शंकरपटांसाठी बैलांना चांगल्या प्रतीचा आहार देऊन पटासाठी तयार केले जाते़ मात्र २०१२ पासून शासनाने शंकरपटावर बंदी आणल्याने ग्रामीण भागातील परंपराच लयास जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र पर्यावरण विभागाने शर्यतींना दिलेल्या परवानगीच्या संकेतामुळे ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरपटांवर आलेल्या बंदीमुळे अप्रत्यक्षरित्या बैलांच्या संगोपनाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात बाहेरगावाहून पाहुणे आल्यामुळे मुले-मुली पाहण्याचा योग सुध्दा येते़ लग्नाच्या चर्चा शंकरपटाच्या निमित्ताने जुळून येत होत्या़ (वार्ताहर)