सराफा व्यापार बंद; तीन कोटींची उलाढाल थांबली
By Admin | Updated: March 3, 2016 01:26 IST2016-03-03T01:26:30+5:302016-03-03T01:26:30+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केला आहे.

सराफा व्यापार बंद; तीन कोटींची उलाढाल थांबली
तीन दिवस राहणार दुकाने बंद : सोने-चांदी व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लावल्याचा निषेध
गडचिरोली/आरमोरी : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर एक टक्का अबकारी कर लागू करण्याचे जाहीर केला आहे. या निर्णयाच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी तीन दिवसांचा देशव्यापी बंद पुकारला असून, गडचिरोली जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत. आरमोरीसह जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवल्याने तीन कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.
अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या व्यवसायावर ए्र टक्का अबकारी कर (एक्साईज ड््युटी) लागू करण्याची घोषणा केली. यामुळे देशभरातील सराफा व्यावसायिकांमध्ये असंतोष पसरला असून, सरकारच्या या निर्णयामुळे सराफा व्यावसायिकांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होईल. शिवाय अबकारी विभागाचे अधिकारी त्रास देणे सुरु करतील. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत असल्याचे गडचिरोली सराफा असोसिएशनचे मार्गदर्शक सुधाकर यनगंधलवार यांनी सांगितले. तीन दिवस दुकाने बंद राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गडचिरोली शहरात सोने-चांदीचा व्यवसाय करणारी ३० दुकाने असून, दररोज ३० लाखांची उलाढाल होते. गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी या मोठ्या तालुक्यांमध्येही सोने-चांदीचा व्यवसाय तेजीत चालतो. संपूर्ण जिल्हयाचा विचार केल्यास जिल्हाभरात दररोज सुमारे १ कोटींची उलाढाल होते. त्यामुळे तीन दिवसांत ३ कोटींची उलाढाल ठप्प पडणार आहे. आरमोरी येथे या बंद आंदोलनात सराफा असोसिएशनचे अध्यक्ष विजय खरवडे, उपाध्यक्ष दीपक बेहरे, सचिव विनोद बेहरे, पंकज खरवडे, अक्षय बेहरे, अविनाश डुबरे, राजीव बेहरे, सुरेंद्र बेहरे, सैफूभाई जीवानी, अभिजीत बेहरे, राकेश बेहरे आदी सहभागी झाले होते.