नियम डावलून जुन्या वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 23:40 IST2018-02-24T23:40:36+5:302018-02-24T23:40:36+5:30
ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना.....

नियम डावलून जुन्या वृक्षांची कत्तल
ऑनलाईन लोकमत
वैरागड : ज्या जंगलाची घनता ४० प्रतिशतपेक्षा कमी आहे. अशा जंगलातील मुदतबाह्य झाडे तोडून त्या ठिकाणी नवीन वृक्षांची लागवड करून जंगलाचे संवर्धन करण्याचे नियम असताना वन विकास महामंडळ आपल्या आर्थिक फायद्यासाठी ४० टक्के पेक्षा अधिक घनता असलेल्या नैसर्गिकरित्या वाढलेल्या घनदाट जंगलाची कत्तल करीत आहे. एफडीसीएमच्या मार्फतीने केली जाणारी कत्तल थांबविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
जुने व कालबाह्य झलेल्या वृक्षांची तोड करून आम्ही नवीन मौल्यवान वृक्ष लागवड करू. जंगलाचे संवर्धन करू, अशी माहिती देऊन देसाईगंज तालुक्यातील विहिरगाव, चिखली, कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, देऊळगाव, भगवानपूर, वाढोणा, सावलखेडा वन क्षेत्रातील घनदाट जंगलांची व गौणवनोजप देऊ शकणाऱ्या झाडांची कत्तल केली जात आहे. मागील तीन वर्षांपासून वृक्षतोड करून त्याची साठवणूक देसाईगंज-कुरखेडा मार्गावर असलेल्या डेपोमध्ये केली जात आहे. जुना तोडलेला लाकूड साठा त्याच ठिकाणी पडून आहे. लिलावात विकला जात नसल्याने सदर लाकूड कुजण्याच्या मार्गावर आहे. जुने लाकूड विकले नसताना वन विकास महामंडळ मात्र नवीन झाडांची तोड करीत आहे. त्यामुळे जंगलाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी ज्या वृक्षांचे संवर्धन केले. त्याच वृक्षांवर वन विकास महामंडळ कुऱ्हाड घालत आहे. स्थानिक नागरिकांचा वृक्ष तोडण्यास विरोध असतानाही त्याला न जुमानताच वृक्षांची तोड केली जात आहे. यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. वन विकास महामंडळाच्या अशा बेजबाबदार कारभारामुळे जिल्ह्यातील शेकडो वर्षांचे जंगलच धोक्यात येण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
एफडीसीएम कायद्याचे उल्लंघन करून ४० प्रतिशतपेक्षा जास्त घनता असलेल्या जंगलात वृक्षतोड करीत आहे. वृक्षतोडीमुळे गौणवनोपज नष्ट होत आहे. गौणवनोपज नष्ट झाल्यास स्थानिक नागरिकांचा रोजगार हिरावला जाणार आहे. त्यामुळे ४० पेक्षा जास्त घनता असलेले जंगल वर्गीकृत करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
- केशव गुरनुले,
संयोजन सृष्टी संस्था येरंडी
राज्य सरकारच्या अखत्यारित हे काम आहे. जे वृक्ष मुदतबाह्य झाले आहेत. त्यातील १० टक्केच वृक्षांची तोड एफडीसीएम करीत आहे. जंगलातील पूर्ण झाडे तोडत असल्याचा गैरसमज चुकीचा आहे. वन विकास महामंडळ ही खासगी कंपनी नसून सरकारच्या परीपत्रकानुसार काम करते.
- डी. एम. राजपूत,
विभागीय व्यवस्थापक, ब्रह्मपुरी