पक्क्या इमारतींवर चालणार बुलडोजर

By Admin | Updated: May 12, 2017 02:36 IST2017-05-12T02:36:00+5:302017-05-12T02:36:00+5:30

देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण हटविण्यात येणार आहे.

Bulldozer running on pavement buildings | पक्क्या इमारतींवर चालणार बुलडोजर

पक्क्या इमारतींवर चालणार बुलडोजर

पोलीस बंदोबस्त मागितला : देसाईगंज शहराच्या राष्ट्रीय महामार्गालगतचे अतिक्रमण हटविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. याकरिता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज पोलीस ठाण्याला पोलीस बंदोबस्त मागितला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीकरिता रस्त्यालगतचे पक्के अतिक्रमण हटविण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे देसाईगंज शहरात प्रचंड खळबळ माजली असून अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे.
दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागभिड यांनी २९ एप्रिल रोजी अतिक्रमधारकांना नोटीस बजावली होती. त्यानंतर ४ मे ला भूमिगत पुलाच्या अपरोच रस्त्यालगतचे अतिक्रमण बुलडोजरच्या सहाय्याने हटविण्यात आले. याच धर्तीवर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज शहरातील मुख्य राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडे पुढील बंदोबस्त मागीतला आहे. २४ एप्रिलला राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अस्थायी पट्टेधारकांसह लहान, मोठ्या अतिक्रमणधारकांना अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली.
देसाईगंज शहरातील साकोली, वडसा, सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील जागेवर अनेक लोकांनी अनधिकृतरित्या अतिक्रमण करून कब्जा केला. सदर कब्जा हटविण्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग उपविभागाने अतिक्रमणधारकांना केली होती. नोटीस तामिल झाल्यापासून तीन दिवसांच्या आत कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग क्र. १४ येथे आपल्या जागेबाबत अधिकृत कागदपत्रांसह अभिवेदन करण्याची संधी देण्यात आली होती. अशा अभिवेदन धारकांची २९ एप्रिलला सुनावणी देण्यात आली. मात्र या नोटीसचे अनुपालन करण्यात अतिक्रमणधारक अयशस्वी झाल्याने सदर अतिक्रमण काढण्यात येणार आहे.
अतिक्रमण हटाओ मोहीम राबविण्यासाठी देसाईगंज पोलीस ठाण्याला पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडाराचे पत्र देसाईगंज पोलीस ठाण्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमधारकांच्या इमारतीवर बुलडोजर चालणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी देसाईगंज पोलीस ठाण्याकडे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून देसाईगंज पोलीस ठाण्यातर्फे सदर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. पोलीस बंदोबस्त मागणीचे पत्र देसाईगंज पोलीस ठाण्याला राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून प्राप्त झाले आहे.
- रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, देसाईगंज

अस्थायी पट्टेधारकांच्या अतिक्रमणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; उपोषणाचा नाकतोडे यांचा इशारा
साकोली-वडसा-गडचिरोली-चामोर्शी - सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी च्या राजमार्गाच्या जमिनीवर देसाईगंज येथे अकरा अस्थाई पट्टेधारकांनी नझूलच्या शासकीय जमिनीवर अनाधिकृतरित्या अतिक्रमण केले आहे. बेकायदेशिर इमारती उभारून तिप्पट अतिक्रमण करून रस्ता वाहतूकीला अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे ११ अस्थायी पट्टेधारकांचे अतिक्रमण सर्वप्रथम ताबडतोब हटविण्याची कारवाई करावी अन्यथा १ जूनपासून उपोषण करणार, अशी इशारावजा लेखी तक्रार राकाँच्या कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष यशवंत नाकतोडे यांनी केली आहे. कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग नागपूर यांच्यासह पत्राच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी गडचिरोली , पोलीस अधीक्षक गडचिरोली, उपविभागीय अधिकारी देसाईगंज , तहसीलदार देसाईगंज, पोलीस निरीक्षक देसाईगंज, उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख कार्यालय देसाईगंज व सहायक अभियंता (श्रेणी १) राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांना उचित कार्रवाईसाठी पाठविले आहे. १७ मार्च १९५१ ला १५ बाय १२ असे एकूण १८० चौ. फूट चौ मी क्षेत्रफळाचे १९ अस्थायी पट्टे व्यावसायिक प्रयोजनार्थ देण्यात आले होते. सदर अस्थाई पट्टे सन १९५०-५१ ते १९६० - ६१ या दहा वर्षाच्या मूदतीकरिता अस्थाई स्वरूपात देण्यात आले होते . मागील ५७ वषार्पासून राष्ट्रीय महामार्गालगत रस्त्यावर अनाधिकृतरित्या, बेकायदेशिरित्या अतिक्रमण करून नियमबाह्य व विना परवानगी इमारत बांधून तिप्पट अतिक्रमण करून रस्ता वाहतूकीला अडथळा निर्माण केलेला आहे. या अतिक्रमणामूळे अनेक अपघात झाले असून बऱ्याच जणांना नाहक जीव गमवावा लागलेला आहे. सदर अनाधिकृतरीत्या अतिक्रमण तात्काळ न हटविल्यास आपल्या कार्यप्रणाली विरूद्ध १ जूनपासून उपोषणाला प्रारंभ करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, अशी विनंती केली असून अतिक्रमण न हटविल्यास भविष्यात अपघात झाल्यास अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गून्हा दाखल करण्यात यावा, असेही नाकतोडे यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Bulldozer running on pavement buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.