विहीर बांधली, पाण्याची टाकी कधी उभारणार?
By Admin | Updated: February 28, 2015 01:36 IST2015-02-28T01:36:37+5:302015-02-28T01:36:37+5:30
राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाच वर्षांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (माल) येथे ...

विहीर बांधली, पाण्याची टाकी कधी उभारणार?
मुरखळा (माल) : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने पाच वर्षांपूर्वी चामोर्शी तालुक्यातील मुरखळा (माल) येथे मुरखळा चक जवळील मोठ्या नाल्यावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यानंतरचे काम थंडबस्त्यात आहे. टाकीचे बांधकाम केव्हा होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम ठप्प झाल्याने मुरखळा (माल) ची नळ योजना रखडल्याच्या स्थितीत दिसून येत आहे.
मुरखळा माल येथे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या टाकी बांधकामासाठी शासनाकडून जवळपास ८२ लाख ६५ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला. मात्र टाकी बांधकामासंदर्भात ठोस पाऊल उचलण्यात आले नाही. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाकडे विचारणा केली असता, संबंधित कंत्राटदारास बांधकाम करण्यासाठी सांगितले असल्याची माहिती मिळाली. नळ योजनेचे काम ठप्प पाडण्यासाठी संबंधित कंत्राटदार की ग्रामीण पाणीपुरवठा विभाग दोषी आहे, हे कळायला मार्ग नाही. नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामात कुठेतरी पाणी मुरत असल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे.
नळ योजनेचे काम थंडबस्त्यात असल्यामुळे गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे. पाच वर्षांपासून मुरखळा (माल) येथील पाणी प्रश्न मार्गी न लागल्यामुळे नागरिक लोकप्रतिनिधी व प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसून येते. (वार्ताहर)
उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार
विभागाच्या वतीने मुरखळा (माल) येथे राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले. या कामासाठी निधी उपलब्ध झाला. मात्र कंत्राटदार व प्रशासनाच्या समन्वय अभावी काम रखडले आहे. पाच हजार लोकसंख्या असलेल्या मुरखळा गावात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.