आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:09+5:302021-06-06T04:27:09+5:30
आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. प्रशिक्षण ...

आरमोरीत स्वच्छतागृहे बांधा
आरमोरी : शहरात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत.
प्रशिक्षण देण्याची द्या
देसाईगंज : मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांची बिकट अवस्था आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन त्यांचा आर्थिक स्रोत वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे कृषी विभागाने याकडे लक्ष देऊन प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी आहे.
विजेचा लपंडाव वाढला
कोरची : कोरची तालुका नक्षलग्रस्त जंगलाने व्याप्त आहे. तालुक्यातील अनेक गावे डोंगरदऱ्यांत आहेत. त्यामुळे जंगलातून विद्युतलाईन गेली आहे. अनेक वर्षांपासून या भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या आहे. मात्र, या समस्येची सोडवणूक झाली नाही.
मार्गदर्शन शिबिर घ्या
अहेरी : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे. मात्र, नोकरीचे प्रमाण कमी झाल्याने बेरोजगारांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगारांना व्यवसायाकडे वळविण्याच्या दृष्टिकोनातून सरकाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला
आष्टी : तालुक्यातील काही गावांमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू आहे. ही कुत्री मुख्य मार्गावर मुक्तसंचार करीत असून, रस्त्यावर इकडे-तिकडे भटकतात.
ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवा
आरमाेरी : आजचे युग हे डिजिटल युग आहे. सर्वच क्षेत्रात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षणसंदर्भात कोणत्याही प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.
सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी
गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपावर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येथे हातपंपावर सौरऊर्जा बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.
तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी
देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र, काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.
धूर फवारणी करण्याची मागणी
गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
दुर्गम भागात कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन सुरू
धानोरा : तालुक्यासह अहेरी उपविभागातील, तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत व दररोज अप-डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी कर्तव्याला दांडी मारली. त्यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडली आहेत. मुख्यालयाची सक्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र, या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
ग्रामीण भागातील स्मशानभूमींची दुरवस्था
आष्टी : जि. प. प्रशासनामार्फत दहन व दफनभूमी बांधण्याची योजना गेले काही वर्षांपासून हाती घेण्यात आली असली, तरी ग्रामीण भागातील अनेक गावातील जुन्या स्मशानभूमीची दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणचे दहनशेड मोडकळीस आले असून, स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्तादेखील नाही.
देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या
आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
तंटे मिटविण्यात समित्या अपयशी
धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र, समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या प्रेमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.
कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज
गडचिरोली : जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने, शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
गतिरोधकांअभावी अपघातास आमंत्रण
गडचिरोली : तालुक्यातील, तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.
कुटुंब नियोजनाचे प्रमाण वाढले
एटापल्ली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले, तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फत सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने या योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे. अनेक याेजनांचे फार्म कार्यवाहीच्या प्रतीक्षेत राहतात.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावे, त्याचबरोबर नाल्या साफ कराव्या, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाही.
शहरातील डुकरांचा बंदोबस्त करा
आलापल्ली : आलापल्ली शहरात डुकरांचा हैदोस वाढला आहे. नगरपंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने सभोवतालचे नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी शहरातही गेल्या काही दिवसांपासून माेकाट डुकरे व जनावरांचा हैदाेस वाढला आहे. सातत्याने मागणी करूनही ग्रामपंचायत प्रशासन सुस्त आहे. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाने माेकाट डुकरांचा व जनावरांचा बंदाेबस्त केला नाही. यासाठी प्रभावी उपाययाेजनाही आखल्या नसल्याचे दिसून येते.