विजेच्या शॉकने मारलेल्या म्हशी जमिनीत पुरल्या
By Admin | Updated: April 8, 2015 01:08 IST2015-04-08T01:08:47+5:302015-04-08T01:08:47+5:30
चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवेगाव (रै.) येथील शेतकरी गोपाळा जिमना बुरांडे यांच्या मालकीच्या दोन म्हशी तांबाशी येथील आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी ....

विजेच्या शॉकने मारलेल्या म्हशी जमिनीत पुरल्या
तळोधी (मो.) : चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवेगाव (रै.) येथील शेतकरी गोपाळा जिमना बुरांडे यांच्या मालकीच्या दोन म्हशी तांबाशी येथील आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी गणपती सातपुते यांच्या मकईच्या शेतात विजेचा शॉक लागून मरण पावल्या. त्यानंतर सातपुते यांनी या घटनेची कुठेही वाच्छता होऊ नये म्हणून शेतातच मोठे दोन खड्डे खोदून त्या म्हशी जमिनीत पुरल्या. यासंदर्भात तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी गणपती सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री ७ वाजता अटक केली.
नवेगाव (रै.) येथील गोपाळा बुरांडे यांच्याकडे सात एकर शेती असून त्यांनी दुग्ध उत्पादनासाठी दोन म्हशीही पाळल्या होत्या. या म्हशी घेऊन गोपाळा बुरांडे २९ मार्च रोजी शेतामध्ये चारण्यासाठी गेले होते. यावेळी म्हशींसोबत बैलजोडीही होती. बुरांडे हे शेतीकामात व्यस्त असताना दोन्ही म्हशी तांबाशी गावाकडे चरत-चरत गेल्या. मात्र आपल्या म्हशी कुनघाडा गावाकडे गेल्या असाव्या, असा तर्क झाल्याने बुरांडे कुटुंब म्हशीचा शोध घेण्यासाठी कुनघाडा येथे गेले. तेथे म्हशी कुणाला दिसल्या का? म्हणून त्यांनी लोकांकडे चौकशी केली. मात्र म्हशींचा पत्ताही लागला नाही. त्यानंतर सलग ५ एप्रिलपर्यंत बुरांडे कुटुंबाकडून म्हशीचा शोध सुरूच होता. मात्र यादरम्यान काही नागरिकांकडून सदर म्हशी उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी गणपती सातपुते यांच्या नदीशेजारी असलेल्या मकईच्या शेतात विद्युत शॉकने मरून पडल्या व त्या त्यांनी शेतातच खड्डा करून पुरल्या, अशी माहिती बुरांडे कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर बुरांडे कुटुंबीयांनी सातपुते यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, मेलेल्या म्हशींचा प्रचंड दुर्गंध परिसरात पसरला होता.
त्यानंतर गोपाळा बुरांडे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री गणपती सातपुते याला अटक केली आहे. सातपुते याच्या विरोधात भादंविच्या ४२९, २०१ व महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड अॅक्टअंतर्गत १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोपाळा बुरांडे यांच्या दोन दुभत्या म्हशी विद्युत शॉकने मेल्यामुळे त्यांचे किमान एक लाख रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसानभरपाई द्यावी व सातपुते यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गोपाळा बुरांडे यांनी केली आहे. (वार्ताहर)