बसपा पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
By Admin | Updated: December 1, 2015 05:37 IST2015-12-01T05:37:54+5:302015-12-01T05:37:54+5:30
बहुजन समाज पार्टीचे राज्य नेतृत्व कमकुवत असून ते योग्य मार्गदर्शन करीत नाही, असा आरोप करीत आपण स्वत:

बसपा पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
गडचिरोली : बहुजन समाज पार्टीचे राज्य नेतृत्व कमकुवत असून ते योग्य मार्गदर्शन करीत नाही, असा आरोप करीत आपण स्वत: व गडचिरोली जिल्ह्यातील बसपाचे बहुतांश पदाधिकारी तसेच सदस्य सामूहिक राजीनामा देत असल्याची माहिती बसपाचे जिल्हाध्यक्ष विलास कोडापे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
बहुजन समाज पार्टीच्या रूपाने फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जनमानसात रूजविण्याचा प्रयत्न यापूर्वी केला जात होता. आता मात्र हा विचार मागे पडला आहे. बसपाही केवळ राजकीय पार्टी म्हणून काम करीत आहे. कॅडर तयार करण्याऐवजी लिडर तयार करण्याचे काम महाराष्ट्रात सुरू झाले आहे. राज्याचे नेतृत्व जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करीत नाही. बहुजन समाज पार्टीच्या विरोधात काम करणाऱ्यांना यापूर्वी पार्टीतून काढून टाकण्यात आले होते. आता मात्र तेच लोक पार्टीमध्ये घेतले जात आहेत. निष्ठावंत कार्यकर्त्यांना या पार्टीमध्ये काहीच जागा राहिली नाही. त्यामुळे सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे. सुरेश माने यांनी बहुजन रिपब्लिकन सोशॉलिस्ट पार्टी (बीआरएसपी) स्थापन केली असून ४ डिसेंबर रोजी याबाबतची अधिकृत घोषणा मुंबई येथील कार्यक्रमात केली जाणार आहे. या पार्टीमध्ये बसपाचे जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत, अशी माहिती विलास कोडापे यांनी दिली आहे. यावेळी श्रीधर भगत, नरेश वाकडे, खुशालचंद गेडाम, गणपत तावाडे, भीमराव जुनघरे, चक्रधर वनकर, डॉ. कैैलाश नगराळे आदी उपस्थित होते.