बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्या निकामी
By Admin | Updated: August 21, 2016 03:39 IST2016-08-21T03:39:08+5:302016-08-21T03:39:08+5:30
भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात संपर्काचे जाळे विणण्यासाठी शासनाने लाहेरी येथे

बीएसएनएल मनोऱ्याच्या बॅटऱ्या निकामी
भ्रमणध्वनी सेवा ठप्प : लाहेरीवासीय त्रस्त
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागात संपर्काचे जाळे विणण्यासाठी शासनाने लाहेरी येथे भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडचा मनोरा उभारला. मात्र या मनोऱ्यातील बॅटऱ्या गेल्या अनेक दिवसांपासून निकामी झाल्याने या भागात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनीसेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. परिणामी या भागातील नागरिक प्रचंड त्रस्त आहेत.
महाराष्ट्र राज्याचा शेवटचा टोक समजल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्यातील लाहेरी या गावात मागील आठ महिन्यांपासून मनोरा उभारण्यात आला. मात्र येथील बॅटऱ्या निकामी झाल्याने सदर मनोरा शोभेची वस्तू बनला आहे. उन्हाळ्यात दिवसातून पाच तास सदर मनोऱ्यातून सेवा सुरू राहायची. मात्र आता पावसाळ्यात ढगाळी वातावरण राहत असल्याने सदर बीएसएनएल मनोऱ्यातील बॅटऱ्या चॉर्ज होत नाही. त्यामुळे येथील अर्ध्याअधिक बॅटऱ्या पूर्णत: निकामी झाल्या आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनही बीएसएनएलचे अधिकारी दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत आहेत. लाहेरी भागात बीएसएनएलची सेवा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने लाहेरी येथील मनोऱ्याच्या ठिकाणी नव्या बॅटऱ्या तत्काळ उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बीएसएनएलची सेवा ठप्प झाल्याने लाहेरी भागातील नागरिकांना मोबाईल वा दूरध्वनीवरून संपर्क साधण्यासाठी प्रचंड आटापिटा करावा लागत आहे. (वार्ताहर)