निधीअभावी पुलाचे काम रखडले

By Admin | Updated: May 24, 2015 02:06 IST2015-05-24T02:06:34+5:302015-05-24T02:06:34+5:30

कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते.

The bridge work stopped due to lack of funds | निधीअभावी पुलाचे काम रखडले

निधीअभावी पुलाचे काम रखडले

अहेरी : कमी उंचीच्या पुलामुळे अहेरी उपविभागातील जनजीवन पावसाळ्यात विस्कळीत होते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवून नव्याने पूल उभारण्यात यावा, अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून होत आहे. मात्र राज्य शासनाने निधी न दिल्यामुळे कमी उंचीच्या पुलाचे बांधकाम रखडले असल्याची माहिती आहे. परिणामी आगामी पावसाळ्यात पुन्हा मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
अहेरी उपविभागात पर्लकोटा, प्राणहिता नदीवर कमी उंचीचे पूल असल्याने पावसाळ्यात वाहतूक ठप्प होते. गडअहेरी तसेच बांडीया नदीवरही कमी उंचीचे पूल असल्याने जनजीवन विस्कळीत होते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने भामरागड भागातील नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. प्राणहिता नदीवर दोन राज्यांना जोडणाऱ्या पुलाचे बांधकाम करण्याची सातत्याने मागणी होत आहे. मात्र याकडेही राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. कमी उंचीच्या पुलामुळे या भागातील १०० हून अधिक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. बांडीया नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने जारावंडी भागातील नागरिकांना जिल्हा निर्मितीच्या ३३ वर्षांनंतरही समस्यांचा सामना करावा लागत आहे.
अहेरीचे तत्कालीन आमदार दीपक आत्राम व तत्कालीन आंध्रप्रदेशचे आमदार कोनप्पा यांनी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाचे वांगेपल्ली येथे भूमीपूजन केले होते. दरम्यानच्या काळात पुलाच्या बांधकामासाठी कोट्यवधी रूपये मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र राज्य सरकारने प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे मागील पाच वर्षभरात या पुलाचे काहीही काम झाले नाही. त्यामुळे पूल निर्मितीचा प्रश्न कायमच आहे. कमी उंचीच्या पुलाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांनी निवेदनातून केली आहे. (प्रतिनिधी)
पालमंत्र्यांकडूनही भ्रमनिरास
आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम व तेलंगणाचे आमदार कोनप्पा यांनी संयुक्तरित्या काही दिवसापूर्वी प्राणहिता नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या प्रस्तावित स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी या भागातील जनतेमध्ये आशेचा किरण निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर पालकमंत्री आत्राम यांच्याकडून या पुलाच्या बांधकाम होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे जनतेचा पुन्हा भ्रमनिरास झाला. बांधकामाअभावी यंदाच्या पावसाळ्यात या भागातील नागरिकांना समस्येचा सामना करावा लागणार आहे.

Web Title: The bridge work stopped due to lack of funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.