रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:09+5:302021-07-03T04:23:09+5:30
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली ...

रेपनपल्ली मार्गावरील पूल कालबाह्य
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुध्दा जीर्ण अवस्थेत आहेत. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहाते. वेळोवेळी वाहतूक खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
एटापल्ली तालुक्यातील सौर दिवे नादुरूस्त
एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौर दिवे लावण्यात आले. परंतु अनेक गावात लावण्यात आलेले सौर दिवे नादुरूस्त अवस्थेत आहेत. सौर दिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौर दिवे निकामी झाले आहेत.
पशुखाद्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ
आलापल्ली : दुभत्या व कष्टाचे काम करणाऱ्या जनावरांना सरकी, ढेप, कडधान्यांचा कोंडा चारला जातो. यामुळे जनावर सुदृढ राहून दूध जास्त देते. वाढत्या महागाईचा फटका पशुखाद्यालाही बसला आहे. किमती १० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
सिरोंचा तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती करा
सिरोंचा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील जवळपास ३०० गावांना अजूनही जाण्यासाठी रस्ते नाहीत. त्यामुळे या गावातील नागरिकांना पायवाटेचाच आधार घ्यावा लागत आहे. शासनाची सडक योजना दुर्गम गावापर्यंत अद्याप पोहोचली नाही.
सुबाभूळ लागवडीसाठी अनुदान द्या
धानोरा : सुबाभूळ लागवडीकरिता शेतकऱ्यांना कृषी व वन विभागाने अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ होतो. त्यामुळे स्थानिक स्तरावरून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन अनुदान द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शेतकऱ्यांसाठी ही बाब फायदेशीर राहणार आहे.
औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहनाची गरज
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे व्यावसायिकांना उद्योग टाकण्यास अडचणी येत आहेत.
कुरखेडातील गावांना लाईनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत राईस मिल, आटा चक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एकाकडे अनेक गावांचा प्रभार आहे.
आरोग्य उपकेंद्रांना इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : उपकेंद्र गावातीलच एका लहानशा भाड्याच्या खोलीत चालविले जात आहेत. इमारत नसल्याने प्रसुती कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे लांब अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गरोदर महिलांना प्रसुतीसाठी न्यावे लागत आहे. आरोग्य उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्याची मागणी होत आहे.
पन्न्या टाकणाऱ्यांवर कारवाई नाही
देसाईगंज : नगर पालिकेच्या क्षेत्रात व्यावसायिक व नागरिक मोठ्या प्रमाणावर काळ्या व पांढऱ्या प्लास्टिक पन्न्यांचा वापर करतात. येथील राजेंद्र वॉर्ड, माता वॉर्ड व गांधी वॉर्डातील अनेकजण दुकान बंद झाल्यानंतर या पन्न्या व प्लास्टिक कागद रस्त्यावर व नाल्यांमध्ये फेकतात. नाल्यांमध्ये प्लास्टिक व पन्न्या टाकल्या जात असल्याने सांडपाणी निचरा हाेण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यांच्यावर कारवाई कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विद्युत तारांवरील फांद्यांची कटाई करा
अहेरी : रस्त्याच्या बाजूने विजेचे खांब आहेत. रस्त्याच्या बाजूला झाडेसुद्धा आहेत. झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर आल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा धोका असतो. त्याचबरोेबर एखादी दुर्घटनासुद्धा घडण्याची शक्यता आहे.
कोरची तालुक्याला अधिकच्या विहिरी द्या
कोरची : तालुक्यात सिंचनाच्या सोयी अजूनही उपलब्ध नाहीत. शासनाने जिल्ह्याला सिंचन विहिरी मंजूर केल्या आहेत. या विहिरींचे वितरण करताना कोरची तालुक्याला प्राधान्य द्यावे.
खुल्या जागांमुळे दुर्गंधी
गडचिरोली : न. प. प्रशासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च करून वाॅर्डात ओपन स्पेस तयार करून संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट लावले. मात्र, या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने या ओपन स्पेसमध्ये कचरा टाकला जात आहे.
एमआयडीसी रखडली
अहेरी : येथे नऊ एकरात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याबाबत प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. काहींना येथे भूखंड आवंटीत करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, औद्योगिक वसाहतीचे काम सध्या रखडले आहे.
घरांची दुरवस्था कायम
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. या घरांमध्ये राहाणे ही कठीण झाले आहे.
गंजलेल्या विद्युत खांबाचा धोका
सिरोंचा : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे.