पूल बांधकाम रखडले
By Admin | Updated: August 19, 2015 01:43 IST2015-08-19T01:43:37+5:302015-08-19T01:43:37+5:30
चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) परिसरातील जोगणा ते लसनपेठ या चार किमीच्या रस्त्यावर मध्यभागी ...

पूल बांधकाम रखडले
पाच वर्षांपासून : जोगणा-लसनपेठ रस्ता उखडलेलाच
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) परिसरातील जोगणा ते लसनपेठ या चार किमीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम रखडले आहे. तसेच गेल्या पाच वर्षांपासून जोगणा-लसनपेठ मार्ग पूर्णत: उखडला आहे. रस्त्यावरील गिट्टी उखडल्यामुळे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी या मार्गावरी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.
या संदर्भात नागरिकांच्या वतीने अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. तसेच निवेदनाद्वारे पाठपुरावाही करण्यात आला. मात्र संबंधित विभागाचे पूल बांधकाम व रस्ता दुरूस्तीकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. तळोधी (मो.) परिसरातील जोगणगुड्डा व लसनपेठ गावासह अनेक गावातील नागरिकांना याच मार्गाने चामोर्शी तालुका मुख्यालय तसेच गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला ये-जा करावे लागते. मात्र सदर मार्ग पूर्णत: उखडल्यामुळे या मार्गाने न जाता या भागातील नागरिक येडानूर मार्गे चामोर्शी व गडचिरोलीचा प्रवास करीत आहेत. परिणामी २५ किमीचे अंतर जादा कापावे लागत आहे.