लाचखोर खनिकर्म अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 06:00 IST2019-11-23T06:00:00+5:302019-11-23T06:00:31+5:30

आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यासंदर्भातील अहवाल एसीबीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला.

The bribery mining officer is not yet suspended | लाचखोर खनिकर्म अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई नाही

लाचखोर खनिकर्म अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई नाही

ठळक मुद्देएसीबीने पाठविला अहवाल : खनिकर्म विभाग घेणार निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वत:च्या कार्यालयात बसून बिनधास्तपणे तब्बल १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या जिल्हा खनिकर्म अधिकारी एस.आर.शेळके यांच्यावर अद्याप त्यांच्या विभागाने निलंबनाची कारवाई केलेली नाही. त्यामुळे खनिकर्म विभाग लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी तर घालत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
आधीपासून वादग्रस्त असणाऱ्या शेळके यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. परंतू कारवाई होत नसल्यामुळे त्यांची हिंमत वाढली होती. त्यातूनच गेल्या ११ नोव्हेंबर रोजी एका रेती कंत्राटदाराकडून १ लाख २० हजार रुपयांची लाच घेताना त्यांना एसीबीच्या पथकाने पकडले. यासंदर्भातील अहवाल एसीबीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाला. तो अहवाल पुढील कारवाईसाठी खनिकर्म विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र शुक्रवारपर्यंत सदर विभागाने शेळके यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती.
वास्तविक शेळके यांची आधीच चंद्रपूरला बदली झाली होती. परंतू गडचिरोलीत दुसरे अधिकारी रुजू झाले नसल्यामुळे शेळके यांनी येथील प्रभार सोडला नव्हता. जाता-जाताही लाचखोरी सुरूच असल्यामुळे त्यांना त्याचे फळ मिळाले, अशी भावना शेळके यांच्यामुळे दुखावलेल्या लोकांनी व्यक्त केली. मात्र त्यांच्या विभागाकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान एसीबीने अटक केल्यानंतर ते जामिनावर सुटले आहे. पण ते सध्या कोणत्याच कार्यालयात रुजू झालेले नाही.

नवीन खनिकर्म अधिकारी रुजू
शेळके यांचे निलंबन अद्याप झाले नसले तरी त्यांचा गडचिरोलीतील प्रभार काढून घेण्यात आला आहे. त्यांच्या जागी रणज्योतसिंग सोखी हे दाखल झाले असून त्यांनी जिल्हा खनिकर्म अधिकारी म्हणून पूर्णवेळ पदभार स्वीकारला आहे. पंजाब कॅडरमधून आलेल्या सोखी यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही नियमबाह्य कामांना थारा दिला जाणार नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The bribery mining officer is not yet suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.