लाचखोर पोलीस निरिक्षक निलंबित
By Admin | Updated: March 6, 2015 01:30 IST2015-03-06T01:30:03+5:302015-03-06T01:30:03+5:30
गिट्टी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी ७ हजार रूपयाची लाच घेणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील ...

लाचखोर पोलीस निरिक्षक निलंबित
गडचिरोली : गिट्टी भरून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता तो सोडण्यासाठी ७ हजार रूपयाची लाच घेणारे चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याला जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी ५ मार्च रोजी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपनिरिक्षक, पोलीस पाटील व वनरक्षक अशा तिघांना लाच घेताना अटक केली आहे. या दोन्ही घटना चामोर्शी तालुक्यातील आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यातील लाचखोरांविरूध्द आक्रमक पाऊल या वर्षभरात उचलले असून शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये लाचखोरीविरूध्द जनजागृती करण्यासाठी प्रसिध्दी पत्रकही जारी केले आहेत. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. गेल्या दोन महिन्यांत नागपूर विभागात ४१ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. मागील वर्षात २०१४ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १७ लाचखोरांविरूध्द कारवाई केली आहे. त्यामुळे लाचखोरांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सापळ्यात अडकलेल्या लाचखोरांमध्ये काही मोठे अधिकारी व लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे. आजपर्यंतच्या एसीबीच्या इतिहासात जिल्ह्याचीही सर्वाधिक सरस कामगिरी मागील वर्षी राहिली. यावर्षात जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता अरविंद चव्हाण याच्यावर अपसंपदेच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोरीतील बहुतांशी जणांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच राज्यातील १० अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. यात जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. वन विभागाने लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेल्या मार्र्कंडा (कं) येथील वनरक्षक नारायण दिगांबर सोळंखे याला निलंबित केलेले नाही. मात्र पोलीस अधीक्षकांनी तत्काळ पोलीस उपनिरिक्षक नेपालचंद मुजूमदार याच्यावर निलंबनाचा बडगा उगारला.