Breathe free while taking the Potegaon route | पोटेगाव मार्ग घेताहे मोकळा श्वास
पोटेगाव मार्ग घेताहे मोकळा श्वास

ठळक मुद्दे४५ ट्रॅक्टर ट्रॉली कचऱ्याची उचल : ४० कामगारांनी दोन दिवस राबविले अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १२ ते १३ वर्षांपासून नगर पालिकेअंतर्गत कंत्राटदारामार्फत शहरातील कचरा पोटेगाव मार्गाच्या कडेला टाकला जात होता. त्यामुळे येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरली होती. दरम्यान शहराच्या स्वच्छतेचे काम घेतलेल्या पुण्यातील कंपनीने ४० कामगारांमार्फत येथे दोन दिवस स्वच्छता अभियान राबवून या भागातील तब्बल ४५ ट्रॅक्टर ट्रॉली कचरा खरपुंडी मार्गावरील डम्पिंग यार्डमध्ये नेऊन टाकला. त्यामुळे आता पोटेगाव मार्ग मोकळा श्वास घेत आहे.
नगर पालिकेच्या वतीने यापूर्वी स्थानिक कंत्राटदारांना शहरातील नाली सफाई, घनकचरा व्यवस्थापन व कचºयाची विल्हेवाट लावण्याच्या कामाचे कंत्राट दिले जात होते. स्वच्छतेच्या कामावर उपकंत्राटदारही असल्याने या कामात दिरंगाई होत होती. कंत्राटदारामार्फत स्वच्छतेचे काम योग्यरित्या होत नव्हते. दरम्यान कंत्राटदाराचे कामगार गेल्या १२ वर्षांपासून शहरातील गोळा केलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पोटेगाव मार्गाच्या कडेला नेऊन टाकत होते. या कचºयावर पाळीव जनावरे व मोकाट डुकरे हैदोस घालत होते. परिणामी या मार्गावर दुर्गंधी येत होती. पहाटे व सकाळच्या सुमारास गडचिरोली शहरातील बरेचसे नागरिक पोटेगाव मार्गावर फिरायला जातात. दरम्यान अनेक नागरिकांनी दुर्गंधी येत असल्याची तक्रार पालिकेकडे केली होती. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. परिणामी पोटेगाव मार्गावर दिवसेंदिवस कचरा व घाणीचे साम्राज्य वाढत गेले.
यावर्षी नगर पालिका प्रशासनाने शहरातील नाली स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाचा कंत्राट पुणे येथील तिरूमला फॅसिलिटी मॅनेजमेंट इंडिया एलएलपी या कंपनीला दिला. सदर कंपनीच्या वतीने सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून शहर स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले.
४ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीमुळे गडचिरोली पालिकेच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरले होते. दरम्यान अनेक कक्षामध्ये गाळामुळे घाण निर्माण झाली. सदर कंपनीच्या कामगारांनी दिवसभर या कार्यालयाची संपूर्ण स्वच्छता केली. गाळ धुऊन काढला. त्यामुळे दुसºया दिवशी ६ सप्टेंबरला सदर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काम करणे शक्य झाले. पोटेगाव मार्गावर प्लास्टिक व ओला तसेच सुका कचºयाचे ढीग साचून होते. ट्रॅक्टर ट्रॉलीने येथील कचरा खरपुंडी मार्गावरील डम्पिंग यार्डमध्ये टाकण्यात आला. शहर स्वच्छतेच्या कामात सुधारणा आल्याचे दिसून येते.

१२५ मजूर कामावर
पुणे येथील कंपनीच्या वतीने नाली सफाई व स्वच्छतेच्या कामासाठी करारनाम्यानुसार १३७ मजूर कामावर घेणे आवश्यक आहे. यापैकी सदर कंपनीने १२५ मजूर आतापर्यंत कामावर लावले असून तेवढ्या मजुरांकडून स्वच्छतेचे काम केले जात आहे. उर्वरित मजूर लवकरच कामावर घेणार असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. मजुरांना ओळखपत्र देण्यात आले असून त्यांचे वेतन बँक खात्यात होणार आहे.

Web Title: Breathe free while taking the Potegaon route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.