ब्रेथ एनालायझरचा मद्यपींवर वॉच
By Admin | Updated: December 21, 2014 23:00 IST2014-12-21T23:00:29+5:302014-12-21T23:00:29+5:30
जुन्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता लक्षात

ब्रेथ एनालायझरचा मद्यपींवर वॉच
गडचिरोली : जुन्या वर्षाला निरोप देण्याबरोबरच नवीन वर्षाच्या स्वागताचा आनंद लुटण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली वाहतूक शाखेने ब्रेथ एनालायझर मशीन सुसज्य ठेवली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे अवैध पध्दतीनेच दारू खरेदी करावी लागते. यामध्ये मद्यपींना आगावूची किंमत मोजावी लागते. त्यामुळे काही युवक वैनगंगा नदीपल्याड असलेल्या बारमध्ये जाऊन आनंद घेणे पसंत करतात. पार्टीचा आनंद उपभोगल्यानंतर वाहनाने प्रवास केला जातो. दारू पिऊन वाहन चालविने गुन्हा आहे. वाहन चालवितेवेळी ५ मिलीगॅ्रमपेक्षा अधिक अल्कोहोल आढळून आल्यास संबंधीत व्यक्तीवर कारवाई केली जाते. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने वाहतूक शाखा व गडचिरोली पोलीससुध्दा जागरूक झाली आहे. या दिवशी शहरासह मुख्य मार्गांवर पोलीस पाळत ठेवणार आहेत. वाहतूक शाखेकडे ब्रेथ एनालायझर मशिन असून सदर मशिन सुरू आहे. या मशिनच्या सहाय्याने मद्यपी चालकांची तपासणी केली जाणार आहे. याचा धस्का मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांनी घेतला आहे.
नववर्षाच्या प्रारंभीला अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ होते. हा दरवर्षीचा पोलिसांचा अनुभव आहे. याला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने यावर्षी सुसज्य तयारी केली आहे. शहरातील चारही प्रमुख मार्गांवर नाकेबंदी केली जाणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत असलेल्या मार्गांवर स्वतंत्र नाका उभारून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. यामुळे मद्यपींचे धाबे दणाणले आहेत. (नगर प्रतिनिधी)