दोघांना गुणवंत कामगार पुरस्कार
By Admin | Updated: April 11, 2017 00:58 IST2017-04-11T00:58:08+5:302017-04-11T00:58:08+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व परिचरास राज्य सरकारचा सन २०१६-१७ चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे.

दोघांना गुणवंत कामगार पुरस्कार
सीईओंनी केले कौतुक : राज्य शासनाकडून होणार गौरव
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी व परिचरास राज्य सरकारचा सन २०१६-१७ चा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार राज्य सरकारतर्फे १ मे २०१७ रोजी त्यांना समारंभात वितरित केला जाणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी टी. एल. पिपरे व परिचर कैलास भोयर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षण विभागात उत्कृष्ट कामगिरी करणारे एम. बी. सय्यद यांचाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गौरव केला. राज्य सरकारकडून या कर्मचाऱ्यांच्या कामाची दखल घेतली गेली. हा गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी सन्मानाचा भाग असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनमोहन चलाख, कृषी विभागाचे कुंभगौणी, धनंजय दुमपट्टीवार, माया बाळराजे आदींसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)