पालिका निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग व अनियमितता
By Admin | Updated: December 25, 2016 01:42 IST2016-12-25T01:42:20+5:302016-12-25T01:42:20+5:30
१८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी

पालिका निवडणुकीत बुथ कॅप्चरिंग व अनियमितता
फेर निवडणूक घ्या : राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार
गडचिरोली : १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या गडचिरोली नगर पालिकेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सत्ताधारी भाजप पक्षाने सत्ता, संपती, प्रशासन व पोलीस बळाचा वापर करून बुथ कॅप्चरींग केले. अनेक केंद्रांवर घोळ करून मतदान प्रक्रियेत अनियमितता केली, अशी तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे काँग्रेस, राकाँ, शिवेसना व युवाशक्तीच्या पराभूत उमेदवारांनी केली असून गडचिरोली पालिकेची फेरनिवडणूक घ्यावी, अशी मागणी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.
यावेळी पत्रकार परिषदेला जयवंत देशमुख, डॉ. अश्विनी धात्रक, संगीता कात्रटवार, सुषमा राऊत, कैलाश शर्मा, बाळू टेंभुर्णे, काशिनाथ भडके, बाळू मडावी, निशांत पापडकर, अमोल कुळमेथे, सुनिता भोयर आदी उपस्थित होते. यावेळी जसवंत देशमुख यांनी सांगितले की, संविधानातील तरतुदींचे उल्लंघन करून गडचिरोली नगर पालिका निवडणुकीची प्रक्रिया बेकायदेशीररित्या पार पाडण्यात आली. जाहीर झालेल्या निकालात प्रदत मतदानाची आकडेवारी शुन्य दाखविण्यात आली आहे. यादीत वेगळ्या प्रतिनिधींच्या नावांचा समावेश आहे. मात्र बूथवर पक्षाचे दुसरेच प्रतिनिधी देण्यात आले. अनेक केंद्रांवर इव्हीएम मशीन बदलल्या. त्यामुळे प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया निर्भीडपणे पार पाडली नाही. परिणामी नागरिकांना बहाल करण्यात आलेल्या संविधानिक मतदानाच्या अधिकाराची हत्याच सत्ताधारी भाजप व प्रशासनाने केली आहे. तसेच मतदान प्रक्रियेत घोळ करण्याचा पूर्वनियोजित कट प्रशासन व भाजपचा होता, असा आरोप जयवंत देशमुख यांनी केला. सुरूवातीला आपल्याला पाच मतांनी विजयी झाल्याचे मतमोजणी कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर पाऊण तासाने भाजपच्या उमेदवार पूजा बोबाटे यांना अडीचशे मतांनी विजयी घोषीत करण्यात आले, अशी माहिती प्रभाग क्रमांक १२ च्या पराभूत उमेदवार सुनिता भोयर यांनी सांगितली. प्रभाग गोकुलनगर क्रमांक १२ च्या मतदान केंद्रावर प्रात्यक्षिकावेळी ज्या इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या होत्या, त्या ईव्हीएम मशीन मतदानाच्या दिवशी त्या केंद्रांवर दिसून आल्या नाही. पाहणी केली असता, या मशीनचे क्रमांक बदलल्याचे दिसून आले, असे पराभूत उमेदवार बाळू टेंभुर्णे यांनी सांगितले. गोकुलनगर येथील रहिवासी मतदार प्रशांत डोमाजी वैरागडे हे प्रभाग क्रमांक १२ च्या तुलतुली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी गेले असता, त्यांच्या नावावर मतदान झाले असल्याचे तेथील निवडणूक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर तक्रार करूनही निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, असा आरोप पराभूत उमेदवार बाळू मडावी यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)