बोदली आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तोडफोड
By Admin | Updated: July 26, 2016 01:22 IST2016-07-26T01:22:10+5:302016-07-26T01:22:10+5:30
तालुक्यातील बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तोडफोड याच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार व इतर तीन कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री केली ....

बोदली आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तोडफोड
पोलिसात तक्रार : डॉक्टरच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य केंद्रात ओली पार्टी
गडचिरोली : तालुक्यातील बोदली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची तोडफोड याच रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार व इतर तीन कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री केली असल्याचा हा आरोप बोदली येथील नागरिकांनी केला आहे.
२४ जुलै रोजी वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार यांचा वाढदिवस होता. यानिमित्त आरोग्य केंद्राच्या परिरसरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते. पार्टीदरम्यान पुरूष आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी दारूचीही व्यवस्था करण्यात आली होती. महिला कर्मचारी जेवणानंतर आपापल्या घरी निवासस्थानी व कर्तव्यावर पोहोचल्या. दारू पिल्यानंतर रात्री १ वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार, परिचर व्ही. पी. बुरे व वाहनचालक जी. एन. बानबले व आणखी एका कर्मचाऱ्याने रुग्णालयासमोरच ठेवलेल्या एमएच-३३-जी-१३५० क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे मागील काच पूर्णपणे तोडले. सदर घटना आपण स्वत: बघितली असल्याचे गावातील नागरिक राजू गावतुरे यांनी चौकशीसाठी आलेल्या जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना सांगितले.
सकाळच्या सुमारास रुग्णवाहिकेची तोडफोड झाली असल्याची बाब बोदली येथील नागरिकांना माहित होताच गावातील युवकांनी डॉ. कन्नमवार यांना उठवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र सदर रुग्णवाहिका आपण फोडली नसल्याचे ते सांगत होते. गावातील नागरिकांनी सदर बाब जिल्हा परिषद सदस्य छाया कुंभारे व पं. स. सदस्य अमिता मडावी यांना फोनवरून सांगितली. कुंभारे व मडावी या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत कोरची येथील जिल्हा परिषद सदस्य सुनंदा आतला व बोदलीचे सरपंच आकाश निकोडे आदीही पोहोचलेत. तोपर्यंत रुग्णालयात बोदली येथील शेकडो युवक व नागरिक जमा झाले होते. कुंभारे यांनी ही बाब जिल्हा महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर यांना फोनवरून सांगून त्यांनाही बोलविले. पोलिसांचा ताफाही घटनास्थळी दाखल झाला. झालेला प्रकार अमिता मडावी व छाया कुंभारे यांनी डॉ. शशिकांत शंभरकर व पोलिसांच्या लक्षात आणून दिला.
रुग्णवाहिका नेमकी कुणी फोडली, याबाबत डॉ. शंभरकर यांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, प्रत्येक कर्मचारी आपल्याला काहीच माहित नसल्याचे सांगत होता.
याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासकीय चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई केली जाईल, रुग्णवाहिका फोडल्याची नुकसानभरपाई सुद्धा वसूल केली जाईल, अशी माहिती डॉ. शंभरकर यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
कन्नमवार यांना निलंबित करा- छाया कुंभारे
वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कन्नमवार यांच्या मनमानी कारभारामुळे आरोग्य केंद्राची दुर्दशा झाली आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार केले जात नसल्याने बहुतांश रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी जातात. एका जबाबदार अधिकाऱ्याने शासकीय इमारतीच्या परिसरात ओल्या पार्टीचे आयोजन करणे व नशेच्या भरात स्वत:च रुग्णवाहिकेची तोडफोड करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे डॉ. कन्नमवार यांच्यावर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, त्याचबरोबर त्यांना निलंबितसुद्धा करावे, अशी मागणी छाया कुंभारे यांनी केली आहे. २७ जुलै रोजी जि. प.ची सर्वसाधारण सभा आहे. या सभेदरम्यान सदर मुद्दा उपस्थित करून डॉ. कन्नमवार यांना निलंबित करण्याचा ठराव घेतला जाईल, अशी माहिती छाया कुंभारे यांनी दिली.