बोम्मावार बंधूसह चौघांना कारागृहातून रविवारी घेणार पोलीस ताब्यात
By Admin | Updated: April 11, 2015 01:30 IST2015-04-11T01:30:01+5:302015-04-11T01:30:01+5:30
बोगस विद्यार्थी दाखवून आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून लाखो रूपयांची शिष्यवृत्ती उचल

बोम्मावार बंधूसह चौघांना कारागृहातून रविवारी घेणार पोलीस ताब्यात
गडचिरोली : बोगस विद्यार्थी दाखवून आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून लाखो रूपयांची शिष्यवृत्ती उचल करण्याच्या प्रकरणात आरोपी असलेले साईराम बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या चार पदाधिकाऱ्यांना चंद्रपूर कारागृहातून गडचिरोली पोलीस रविवारी पोलीस कोठडीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गाजत असलेल्या २५ कोटींहून अधिक रक्कमेच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात साईराम बहुउद्देशीय सहकारी संस्था सावलीचे अध्यक्ष रोहित चरणदास बोम्मावार, उपाध्यक्ष राकेश सोमेश्वर पेद्दुरवार, सचिव विजय वसंतराव कुर्रेवार व कोषाध्यक्ष तथा सावलीचे पत्रकार सुरज रामदास बोम्मावार या चौघांवर चामोर्शी व गडचिरोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बोम्मावार यांच्या साईराम बहुउद्देशीय संस्थेमार्फत चामोर्शी येथे कै. राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ टेक्नालॉजी अँड मॅनेजमेंट व गडचिरोली येथे विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नालॉजी अँड मॅनेजमेंट हे दोन महाविद्यालय चालविले जात होते. या महाविद्यालयात बोगस विद्यार्थी दाखवून बोम्मावार यांनी आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून लाखो रूपयांची शिष्यवृत्ती उचल केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोम्मावार बंधूसह चारही आरोपी फरार होते. न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केलेत. सर्वोच्च न्यायालयातही त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता.
मात्र सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतरही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दुसऱ्या एका महाविद्यालयाच्या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान हायकोर्टासमोर बोम्मावार यांनी आपण दोन दिवसात न्यायालयात आत्मसमर्पण करू, असे सांगितले होते. त्याप्रमाणे गुरूवारी चामोर्शी येथील प्रथमश्रेणी तालुका न्यायालयात चौघांनीही आत्मसमर्पण केले. न्यायालयाने त्यांची चंद्रपूर कारागृहात रवानगी केली होती. त्यानंतर शुक्रवारी शिष्यवृत्ती प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी चामोर्शी न्यायालयात बोम्मावार बंधूसह चौघांना पोलीस कोठडीत देण्यात यावे, असा विनंती अर्ज न्यायालयाकडे सादर केला. पोलिसांच्या या अर्जावर न्यायालयाने बोम्मावार बंधूसह चौघांना पोलिसांच्या ताब्यात देण्याबाबत परवानगी दिली आहे. रविवारी गडचिरोली पोलीस या चौघांना अटक करण्यासाठी चंद्रपूर कारागृहात जाणार असल्याची माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर सोमवारी सदर आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)