बोम्मावार बंधू दोन दिवसात होणार न्यायालयात हजर
By Admin | Updated: April 8, 2015 01:09 IST2015-04-08T01:09:38+5:302015-04-08T01:09:38+5:30
गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

बोम्मावार बंधू दोन दिवसात होणार न्यायालयात हजर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी असलेले विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी व राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजीचे संचालक रोहित बोम्मावार व सूरज बोम्मावार या दोघा आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्याभारती कॉलेज गडचिरोलीच्या प्रकरणात दाखल केलेला बेल अर्ज मंगळवारी मागे घेतला व दोन दिवसांत चामोर्शी तालुका न्यायालयात हजर होण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
नागपूर येथील उच्च न्यायालयात सोमवारपासून सात आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद दिवसभर चालला. तसेच लेखा अधिकारी मनोजकुमार मून, तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके , सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण झाला. याशिवाय अॅस्पायर शिक्षण संस्थेचा संचालक शाहाबाज हैदर, शिवनेरी शिक्षण संस्थेचा संचालक विघ्नोज राजुरकर यांच्या जामीनावर बुधवारी उच्च न्यायालयात युक्तीवाद होणार आहे. सध्या पोलीस यंत्रणा फरार आरोपींच्या मागावर आहे. (प्रतिनिधी)