वणव्यात एफडीसीएममधील बांबू रोपवन जळून खाक
By Admin | Updated: April 28, 2017 01:13 IST2017-04-28T01:13:13+5:302017-04-28T01:13:13+5:30
पोर्ला वन विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नवेगाव बिटातील कक्ष क्रमांक ८ मध्ये वणवा लागल्याने

वणव्यात एफडीसीएममधील बांबू रोपवन जळून खाक
नवेगाव बिटातील कक्ष क्रमांक ८ ला आग : एकूण लागवडीपैकी दहाच टक्के झाडे होती शिल्लक
जोगीसाखरा : पोर्ला वन विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या नवेगाव बिटातील कक्ष क्रमांक ८ मध्ये वणवा लागल्याने या ठिकाणी लावलेले बांबू रोपवन ८० टक्के जळून खाक झाले आहे. बांबू रोपवन लागवडीवर आजपर्यंत झालेला लाखो रूपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. या गंभीर प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च्या मर्जीने उभे जंगल तोडून नवेगाव बिटात कक्ष क्रमांक ८ मध्ये २५ हेक्टर क्षेत्रावर नवीन बांबू रोपवन निर्माण केले. त्यापैकी १२ हेक्टर जागेवर शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमातून पाच हजार झाडे लावण्यात आली होती. अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाडे लावण्यात आली. त्याचबरोबर झाडे लावल्यानंतर या झाडांची काळजी घेण्यासाठी वन विकास महामंडळाने कोणतीही उपाययोजना केली नाही. परिणामी पावसाळा संपल्यानंतर अर्ध्यापेक्षा अधिक झाडे नष्ट झाली. या रोपवनात १० टक्के सुध्दा झाडे जीवंत नाहीत. झाड नसलेल्या ठिकाणी सुध्दा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कठडे तयार केले आहे. उभे जंगल तोडून वन विभागाने लावलेले रोपवनही देखभालीअभावी नष्ट झाले होते. याची चौकशी करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात होती. १० टक्केपेक्षाही कमी झाडे जिवंत असल्याने आपले पितळ उघडे पडेल, या भितीपोटी एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांनी आग लावल्याची चर्चा केली जात आहे. संपूर्ण बिटामध्ये केवळ बांबू रोपवनालाच आग लागल्याने या चर्चेलाही बळ मिळू लागले आहे. लाखो रूपये खर्च झालेल्या बांबू रोपवनाच्या संरक्षणाकरिता एकही चौकीदार कार्यरत नाही. फायरलाईन सुध्दा जाळण्यात आली नाही. रोपवनात नेहमीच जनावरांचा वावर राहत असल्याची निदर्शनास येते. शासनाने रोपवनासाठी दिलेला निधी गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे शासनाला कोट्यवधी रूपयांचा चूना लागला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)
रोपवनाच्या संरक्षणासाठी प्रकाश ठाकरे हा चौकीदार ठेवण्यात आला आहे. आयडब्ल्यूसी व ओडब्ल्यूआरची कामे दुसरीकडे सुरू आहेत. सर्वच कामे त्यालाच सांभाळावी लागतात. फक्त दोन हेक्टरवरील जंगल जळाले आहे.
- डी. एन. केंद्रे, वन परिक्षेत्राधिकारी पोर्ला