बोगस संस्थांनी उचललेली रक्कम थक्क करणारी
By Admin | Updated: January 11, 2015 22:51 IST2015-01-11T22:51:34+5:302015-01-11T22:51:34+5:30
एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे

बोगस संस्थांनी उचललेली रक्कम थक्क करणारी
गडचिरोली : एकीकडे महाविद्यालयांना विद्यार्थी मिळत नसल्याने त्यांच्या तुकड्या बंद पडत आहे. तर दुसरीकडे तांत्रिक शिक्षण देणाऱ्या या महाविद्यालयांकडे विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा प्रचंड महापूर आहे की, काय अशी स्थिती उचललेल्या शिष्यवृत्तीच्या रक्कमांवरून दिसून येत आहे. महाविद्यालयांची पाहणी करून तेथे एवढे विद्यार्थी आहेत काय याची शहानिशा न करता सरसकट शिष्यवृत्ती वितरणाचे काम आदिवासी विकास विभागाच्या अहेरी व भामरागड प्रकल्पाने केले, असे ‘लोकमत’ला मिळालेल्या या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
हिंदी राष्ट्रभाषा ज्ञानमंडळ वर्धाद्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज आलापल्लीने समाज कल्याण विभागाकडे १८० अनुसूचित जातीचे विद्यार्थी नोंदविले व १३९ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. तसेच आदिवासी विभागाकडे ११० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली व ९७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. दोनही विभागाचे मिळून २३६ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ४० हजार प्रमाणे ९४ लाख ४० हजार रूपये एका महाविद्यालयाने उचलले आहे. असाच प्रकार अहेरीच्या विद्याभारती कॉलेज आॅफ अॅडव्हान्स स्टडीज या महाविद्यालयानेही केला आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेले हे महाविद्यालय गुरूकूल शिक्षण संस्था वर्धाद्वारा संचालित चालविले जाते. या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे अनुसूचित जातीचे १४८ विद्यार्थी नोंदविले व १३३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचल केली. ४४ ओबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून ३०, आठ एसबीसी विद्यार्थ्यांची नोंदणी करून पाच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम उचलली. त्यासोबतच १८ व्हीजेएनटी विद्यार्थ्यांची नोंदणी समाज कल्याण विभागात करून १५ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम उचलली. समाज कल्याण विभागाकडून २१७ पैकी १८३ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे ३२ लाख ९४ हजार रूपये उचल केले आहे. प्रती विद्यार्थी १८ हजार रूपये प्रमाणे या रक्कमा घेण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाकडे या महाविद्यालयाने ५२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली. मात्र तेथून शिष्यवृत्तीची रक्कम त्यांना मिळविता आली नाही. या संस्थेचे काम वर्धा येथील भाजपच्या एका आमदाराच्या मार्गदर्शनात वर्धाच्याच एक कार्यकर्ता करीत आहे, अशी माहिती ‘लोकमत’ला मिळाली आहे. एटापल्लीच्या सद्गुरू साई या राहुल बोम्मावार यांच्या महाविद्यालयाने समाज कल्याण विभागाकडे ४४ अनुसूचित जाती, १७५ ओबीसी, आठ एसबीसी व १६ व्हीजेएनटी अशा एकूण २४३ विद्यार्थ्यांची नोंदणी शिष्यवृत्तीसाठी केली व या सर्वांची शिष्यवृत्ती त्यांनी उचलली आहे. आदिवासी विकास विभागाकडे सन २०१३-१४ मध्ये १४१ विद्यार्थ्यांची नोंदणी करून १३९ विद्यार्थ्यांचे पैसे त्यांनी उचल केले. १ कोटी ५२ लाख ८० हजाराच्या घरात हा आकडा जातो. ही सर्व आकडेवारी पाहू जाता आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयातील अधिकाऱ्यांचे संपूर्ण आशिर्वाद या संस्थाचालकांना असल्याने त्यांनी शासनाला कोट्यवधी रूपयाचा चूना अहेरी व भामरागड एकात्मिक प्रकल्पातही लावलेला आहे. त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी सुरू होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)