भामरागडसाठी बोटीची मागणी
By Admin | Updated: September 21, 2015 01:23 IST2015-09-21T01:23:52+5:302015-09-21T01:23:52+5:30
भामरागड येथे त्रिवेणी संगम आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरते व भामरागड मुख्यालयाच्या चारही बाजूने पाणी वेढते.

भामरागडसाठी बोटीची मागणी
भामरागड : भामरागड येथे त्रिवेणी संगम आहे. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरते व भामरागड मुख्यालयाच्या चारही बाजूने पाणी वेढते. त्यामुळे भामरागडचा जगाशी संपर्क तुटून गावाची सीमा ओलांडणे शक्य होत नाही. त्यामुळे महत्त्वाच्या कामावर पाणी फेरावे लागते. याचा अनुभव शहरातील जनतेसह अनेकवेळा अधिकाऱ्यांना आला आहे. त्यामुळे आकस्मिक परिस्थितीत नदी पार करण्यासाठी बोट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
भामरागड-आलापल्ली मार्गावर पर्लकोटा नदी आहे. या नदीचा पूल अत्यंत ठेंगणा आहे. त्यामुळे पाऊस होताच पुलावरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. पावसाळ्याच्या दिवसात कित्येक दिवस पुलावरून पाणी राहत असल्याने तालुक्याचा जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी बोट उपलब्ध करून दिल्यास नदी पार करण्यास सुलभ होईल. आपत्ती व्यवस्थापनावर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. मात्र भामरागड तालुक्याला बोट उपलब्ध करून दिली जात नसल्याने नागरिकांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (तालुका प्रतिनिधी)