काळी पिवळी टॅक्सी उलटली
By Admin | Updated: April 10, 2017 00:57 IST2017-04-10T00:57:15+5:302017-04-10T00:57:15+5:30
गडचिरोली नगर परिषदेतील नऊ कामगार पर्यटनासाठी भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे गेले होते.

काळी पिवळी टॅक्सी उलटली
१२ जण जखमी : लाहेरी गावानजीकची घटना
लाहेरी : गडचिरोली नगर परिषदेतील नऊ कामगार पर्यटनासाठी भामरागड तालुक्यातील बिनागुंडा येथे गेले होते. तेथून भामरागडकडे परत येत असताना काळी-पिवळी टॅक्सी उलटल्याने चालकासह टॅक्सीतील १२ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास लाहेरी गावापूर्वी दोन किमी अंतरावर घडली.
या अपघातात राजेश मधुमटके यांचे आठ सहकारी तसेच टॅक्सी चालक व त्याचे दोन सहकारी असे १२ जण जखमी झाले. लाहेरी पोलिसांनी त्यांना प्राथमिक उपचारासाठी लाहेरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची नोंद लाहेरी उपपोलीस ठाण्यात करण्यात आली असून काळी-पिवळी टॅक्सीचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक रवींद्र गवारी करीत आहेत. दुसऱ्या शनिवारला ८ एप्रिल रोजी शासकीय सुटी असल्याने गडचिरोली नगर परिषदेतील कामगार राजेश मधुमटके यांच्यासह त्यांचे नऊ सहकारी भामरागड तालुक्यातील लाहेरी नजीकच्या बिनागुंडा येथील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी एका खासगी वाहनाने भामरागडला आले. मात्र भामरागड-बिनागुंडा हा कच्चा रस्ता असल्याने झायलो गाडीच्या चालकाने बिनागुंडाला येण्यास नकार दिला. त्यामुळे या सर्व लोकांनी भामरागड येथून एमएच ३३ एम ५०९८ क्रमांकाची खासगी काळी-पिवळी टॅक्सी भाडेतत्वावर घेतली. १२ जण या वाहनाने बिनागुंडा येथे गेले. तेथील निसर्गरम्य धबधबा पाहून झाल्यावर ते भामरागडकडे परत येत होते. दरम्यान लाहेरी गावापूर्वी सुमारे दोन किमी अंतरावर टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या वाहनाला अपघात घडला व वाहन उलटले. यात टॅक्सीतील बाराही जण जखमी झाले. या जखमींवर उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)