दोनही नगर पालिका क्षेत्रात भाजपची सरशी
By Admin | Updated: October 21, 2014 22:50 IST2014-10-21T22:50:49+5:302014-10-21T22:50:49+5:30
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात असलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने मताधिक्यात सरशी घेत आपले वर्चस्व अबाधित ठेवले.

दोनही नगर पालिका क्षेत्रात भाजपची सरशी
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात असलेल्या गडचिरोली व देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने मताधिक्यात सरशी घेत आपले वर्चस्व अबाधित ठेवले. जिल्ह्याच्या दोनही नगर पालिका क्षेत्रात काँग्रेस मागील निवडणुकीच्या तुलनेत माघारली. गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात मतांच्या बाबतीत काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर तर देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती. केवळ काँग्रेस पक्षालाच नव्हे तर इतरही पक्षांना या निवडणुकीत कमी मतांचा फटका बसला.
गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात ४२ मतदान केंद्रांवर मतदान झाले. एकूण बुथवर भारतीय जनता पक्षाला ७ हजार २ मते मिळाली. शिवसेनेला २ हजार ३४६, काँगे्रसला २ हजार २०७, बहुजन समाज पार्टीला २ हजार १७८ तर राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीला १ हजार ६१ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना, तृतीय क्रमांकावर भारतीय राष्ट्रीय काँगे्रस, चवथ्या क्रमांकावर बसपा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गडचिरोली नगर पालिकेवर पूर्वाश्रमीचे युवाशक्तीत असलेले अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहिल्याने गडचिरोली शहरात शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मते मिळतील, असा कयास अनेकांकडून लावला जात होता. परंतु तसे न घडता भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक ७ हजार २ मते मिळाली. नगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्ष ४ हजार ६५६ मतांनी वरचढ राहिला.
जिल्ह्यात सर्वात जुनी नगर पालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देसाईगंज येथील नगर पालिका क्षेत्रातही भारतीय जनता पक्षाने मतांच्या बाबतीत जोरदार मुसंडी मारली. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला नगर पालिका क्षेत्रातील एकूण बुथमधून ६ हजार ३१७ मते प्राप्त झाली. तर ३ हजार ७५० मते घेऊन काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भारतीय जनता पक्षाला चव्हाण वार्डातून सर्वाधिक ५३३ तर सर्वात कमी १७१ मते किदवई वार्डातून मिळाली. काँगे्रसला सर्वाधिक ५६२ मते जवाहर वार्डातून तर ३५ मते शास्त्री वार्डातून मिळाली. बहुजन समाज पार्टीने २ हजार १०२ मते घेऊन तिसरे स्थान मिळविले. बसपाला सर्वाधिक ३०५ मते आंबेडकर वार्डातून तर सर्वात कमी १२ मते शास्त्री वार्डातून मिळाली. शिवसेनेला देसाईगंज पालिका क्षेत्रात ९४७ मते प्राप्त झाली. सर्वाधिक १६७ मते नैनपूर वार्डातून तर सर्वात कमी १४ मते किदवई वार्डातून प्राप्त झाली. देसाईगंज पालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ १११ मतांवरच समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसला जवाहर वार्डात सर्वाधिक ११ तर कन्नमवार वार्डात एकही मत प्राप्त झाले नाही. देसाईगंज नगर पालिका क्षेत्रात भारतीय जनता पक्षाने २ हजार ५६७ मते प्राप्त करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुसऱ्या तर बहुजन समाज पार्टीला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. जिल्ह्यातील दोनही नगर पालिका क्षेत्रात भाजपने मताधिक्यात मुसंडी मारली. (शहर प्रतिनिधी)