भाजपचे पारडे जड

By Admin | Updated: October 18, 2014 01:26 IST2014-10-18T01:26:30+5:302014-10-18T01:26:30+5:30

गडचिरोली जिल्ह्यात तीन मतदार संघात सरासरी ६६.१६ टक्के मतदान झाले आहे. या मतदानाच्या आधारावर...

BJP's Pardes heavy | भाजपचे पारडे जड

भाजपचे पारडे जड

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात तीन मतदार संघात सरासरी ६६.१६ टक्के मतदान झाले आहे. या मतदानाच्या आधारावर सध्या मतदारांमध्ये कोण विजयी होतो, याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते जिल्ह्यात भाजपचे पारडे जड होईल, असा तर्क लावल्या जात आहे. तर काहींना एका मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसलाही विजयाची संधी आहे, असे वाटत आहे. मात्र या सर्व परिस्थितीत विविध भागातील मतदानाची टक्केवारी पाहू जाता, निकालाबाबत संभ्रमावस्था कायमच आहे. सट्टा बाजार व एक्झिट पोल राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा दावा करीत आहे. गडचिरोली जिल्ह्यात मात्र तिनही मतदार संघात थेट लढती झाल्याचे मतदानानंतर स्पष्ट झाले आहे. विविध जातीनिहाय मतदानही वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पक्षांना व उमेदवारांना झाल्याने राजकीय समीकरण पूर्णत: बदलतील, अशी शक्यता आहे.
६७ आरमोरी विधानसभा क्षेत्रात २ लाख ३८ हजार ६९२ मतदारांपैकी १ लाख ७१ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. येथे ७१.९० टक्के मतदान झाले आहे. या मतदार संघात १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे विजयासाठी किमान ४० हजार मते लागतील, अशी मतदारांमध्ये चर्चा आहे. या मतदार संघात कोरची, कुरखेडा, वडसा, आरमोरी या चार तालुक्यासह धानोरा तालुक्याचे दोन महसूल मंडळ समाविष्ट आहे. जनचर्चेवरून कोरची तालुक्यात काँग्रेसला किमान २ हजारापर्यंत आघाडी राहील, असे काहींचे म्हणणे आहे. तर काही जण कुरखेडा भागात पंजा लीड घेणार, असा दावा करीत आहे. आदिवासीबहुल क्षेत्रात पंजाने मुसंडी मारली, असेही सांगण्यात येत आहे. मात्र अनुसूचित जातीचे मतदान बहुजन समाज पक्षाकडे तर मुस्लिम मतदार हे भाजपसह काँग्रेसकडेही वळले, अशी राजकीय कार्यकर्त्यांची चर्चा आहे.
काँग्रेसमधून भाजपावासी झालेले कार्यकर्ते व नेते मात्र या जनचर्चेला मानण्यास तयार नाही. कोरची, कुरखेडा तालुक्यात भाजप लीड घेईल, असा त्यांचा दावा आहे. देसाईगंज शहरात यावेळीही पंजा आघाडी घेण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी शहरात पंजाचे काम केले, अशी चर्चा पसरली आहे. मात्र देसाईगंज तालुक्याच्या ग्रामीण भागात भाजपने मुसंडी मारली आहे. विसोरा येथे पंजा समोर राहील, असा राजकीय जाणकार दावा करीत आहे. तुळशी गावात धनुष्य व कमळ बरोबरीत सुटेल, असेही राजकीय जाणकार मानतात. आरमोरी तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात मात्र कमळाची मुसंडी आश्चर्यकारक राहील, असे मतदार सांगतात. एकूणच २००९ च्या निवडणुकीत आरमोरी तालुक्यानेच काँग्रेसच्या बाजुने निकाल पलटविला होता. तीच परिनिती यावेळीही निकालात होईल. मात्र हा निकाल ५ हजाराच्या फरकात असेल, अशी चर्चा आहे. मात्र भाजपवासी झालेले राजकीय नेते व कार्यकर्ते भाजपच्या विजयाचे अंतर २० हजाराच्या घरात सांगत आहे.
६८ गडचिरोली विधानसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेत थेट लढत होईल, असे चित्र मतदानानंतर दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही येथे मोठी मताधिक्य घेण्याची शक्यता आहे. गडचिरोली शहरात भाजप व शिवसेनेला समसमान मतदान राहील, असा तर्क लढविला जात आहे. मात्र शहरातील सुशिक्षित मतदारांनी उमेदवार न पाहता, नरेंद्र मोदी यांची प्रतिमा व एकाच पक्षाचे केंद्रात व राज्यात सरकार राहिले पाहिजे या मानसिकतेतून मतदान केल्याचे मतदानाच्या दिवशी लोकमतने केलेल्या अवलोकनावरून आढळून आले आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात कमळ अधिक राहण्याची शक्यता आहे. गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागातही काही जिल्हा परिषद क्षेत्र वगळता बऱ्याच ठिकाणी गैरआदिवासी मतदारांनी नोटाचा मोठा वापर केला व जे मतदान झाले आहे, त्यातील बहुसंख्य मतदान हे भाजपच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. मौशीखांब, मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात भाजपची मुसंडी राहील, असा राजकीय सुत्रांचा अंदाज आहे. तसेच बहिष्कार असलेल्या गावांमध्ये जे मतदार मतदान केंद्रावर गेले त्यामध्येही कमळाचा मतदार मोठा होता, अशी चर्चा आहे.
चामोर्शी तालुक्यात ६९ हजारावर मतदान झाले आहे. भेंडाळा भाग वगळता कमळाने प्रत्येक भागात चांगले मतदान घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथे कमळ झालेल्या मतदानात पहिल्या स्थानावर राहील, अशी चर्चा आहे. तळोधी मो. परिसरातील अरण्यभागातील गावांमध्ये घड्याळ्याची चलती असल्याचे दिसून आले आहे. धानोरा तालुक्यात धनुष्यबान व कमळ यामध्ये तुल्यबळ लढत आहे. येथे दोघांत कोण बाजी मारतो, यावर या मतदार संघाचा निकाल अवलंबून राहील. या मतदार संघात किमान १५ हजारावर नोटा मतदान जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
अहेरी विधानसभा क्षेत्रात नाविस, भाजप, महायुतीचा सामना राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे मतदानावरून दिसून येत आहे. सिरोंचा तालुक्यात मतदानाच्या आदल्या दिवशी घड्याळ्याने जोरदार मुसंडी मारल्याची चर्चा आहे. सिरोंचा ग्रामीण पट्ट्यातही घड्याळ जोरात आहे. पेरमिली, कमलापूर या जिल्हा परिषद क्षेत्रात कमलापूर भागात अम्ब्रीशरावांना आघाडी मिळण्याची शक्यता असून पेरमिली भागात मात्र भाजपला मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे. भामरागड तालुक्यात घड्याळ व कमळ बरोबरीत सामना राहील. एटापल्ली तालुक्यात तिरंगी लढत आहे. घड्याळ, टेबल व कमळ या लढतीत कमळ ५०० च्या फरकात आघाडी घेईल, अशी चर्चा आहे.
जिमलगट्टा भागात घड्याळाचा जोर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अहेरी, आलापल्ली भागातील व अहेरीच्या ग्रामीण भागातील मतदानावर या क्षेत्राचा निकाल अवलंबून राहील. मुलचेरा तालुक्यात मतदानापूर्वी महाराजांच्या छायाचित्राची प्रतिमा अनेक घरांवर लागली होती. मात्र मतदानाच्या दिवशी या भागात काही ठिकाणी घड्याळाने मुसंडी मारली आहे. त्यामुळे येथेही संभ्रमावस्था आहे. या मतदार संघात ७० टक्के मतदान झाले आहे. तरूण वर्गाचे मतदान भाजपच्या पथ्थ्यावर गेलेले आहे. मुस्लिम मतदार सर्वच पक्षात विभाजीत झाले. काही भागामध्ये बसपाचा हत्तीही चांगला धावला आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी घड्याळ जवळ केल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदार संघात धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. कोण बाजी मारतो हे १९ तारखेला स्पष्ट होईल. सध्यातरी गुप्तचर विभागाचा अहवाल जिल्ह्यात भाजपचे पारडे जड राहील, असे सांगत आहे. मात्र सट्टा बाजार दोन जागांवर भाजप तर एका जागांवर अन्य राजकीय पक्ष विजयी होईल, असा दावा करीत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP's Pardes heavy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.