भाजपची निकालात मुसंडी
By Admin | Updated: November 8, 2015 01:28 IST2015-11-08T01:28:48+5:302015-11-08T01:28:48+5:30
नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली.

भाजपची निकालात मुसंडी
धानोरात अपक्ष : अहेरीत भाजप, चामोर्शीत काँग्रेस तर मुलचेरात राकाँला निर्विवाद यश
गडचिरोली : नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली. तर काँग्रेसने ३४ व राकाँ ३२ जागा जिंकल्या आहे. अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष, चामोर्शीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर मुलचेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. धानोरा नगर पंचायत निवडणुकीत ललीत बरछा यांच्या नेतृत्वातील ग्राम विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे.
जिल्ह्याच्या नगर पंचायत निवडणुकीचा कौल पाहू जाता सत्ताधारी भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचा विचार करता काँग्रेसला ३४ व राकाँला ३२ अशा एकूण ६६ जागांवर या दोन पक्षांनी मुसंडी मारली आहे. तर राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता भाजपला ५० व शिवसेनेला १२ अशा ६२ जागा या पक्षाच्या पदरात पडताना दिसतात. सिरोंचा, एटापल्ली या अहेरी विधानसभा मतदार संघातील नगर पंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व आदिवासी विद्यार्थी संघ मिळून सत्ता स्थापन करू शकतात, अशी स्थिती आहे. भामरागड येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडी करून आपले संख्याबळ १० वर नेऊ शकतात. त्यामुळे अहेरी वगळता भाजपला सत्ता स्थापनेसाठी उपविभागात बरीच कसरत करावी लागणार आहे. मुलचेरा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले आहे.
अहेरी क्षेत्राचा विचार करता भाजपला ३० तर राकाँला २९ जागा मिळाल्या आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कुरखेडा येथे भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले असून ७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. कुरखेडात शिवसेनेचे प्राबल्य असताना सेनेला केवळ ५ जागा मिळाल्या आहे. काँग्रेसला येथे ३ जागा तर राकाँला १ जागा मिळाली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहू शकते. शिवसेना-भाजप युती झाल्यास ही नगर पंचायत युतीच्या ताब्यात जाईल. कोरचीत सेना-भाजप युती करूनच निवडणूक लढले. त्यामुळे या नगर पंचायतीत त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी दावा राहील. एकूणच नगर पंचायत निकालाने सत्ताधारी पक्षाला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे एक खासदार व एक राज्यमंत्री व तीन आमदार असताना चामोर्शीसारख्या मोठ्या नगर पंचायतीत भाजपला काँग्रेसने प्रचंड तडाखा दिला. याशिवाय धानोरा नगर पंचायतीतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गडचिरोली क्षेत्रात भाजपची पिछेहाट झाली आहे.