भाजपाने बंद पडलेले उद्योग सुरू करावे- विजय वडेट्टीवार

By Admin | Updated: August 28, 2015 00:09 IST2015-08-28T00:09:05+5:302015-08-28T00:09:05+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग बंद पडले आहेत. सदर उद्योग सुरू केल्यानंतरच भाजपाने नवीन उद्योग सुरू करावे.

BJP should start the shutdown industry - Vijay Vedettyvar | भाजपाने बंद पडलेले उद्योग सुरू करावे- विजय वडेट्टीवार

भाजपाने बंद पडलेले उद्योग सुरू करावे- विजय वडेट्टीवार

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील ८० टक्के उद्योग बंद पडले आहेत. सदर उद्योग सुरू केल्यानंतरच भाजपाने नवीन उद्योग सुरू करावे. केवळ घोषणा करणे हे भाजपाचे काम बनले आहे, अशी टीकाही काँग्रेसचे विधानसभा उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी इंदिरा गांधी चौकातील युवक काँग्रेसच्या उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान केली.
खासदार अशोक नेते यांनी काँग्रेसच्या ३० वर्षांच्या राजवटीमुळे जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याची टीका केली होती. याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी खासदार नेते हे १० वर्षे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते. त्यांनी १० वर्षात केलेल्या कामाचा आढावा द्यावा, आपण २० वर्षांचा हिशोब त्यांना देऊ. काम करण्यासाठी सत्तेची गरज नसून त्यासाठी इच्छा असावी लागते. चंद्रपूरसह राज्यातील ८० टक्के उद्योग बंद पडत चालले आहेत. या उद्योगांना सर्वप्रथम सुरू करावे, त्यानंतरच नवीन उद्योग सुरू करावे. नजीकच्या छत्तीसगड राज्यात मागील १५ वर्षांपासून भाजपाचे सरकार आहे. तेथे ना उद्योग स्थापन झाले, ना नक्षलवाद कमी झाला नाही. केंद्रात सत्ता येऊन १८ महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र जिल्ह्यात एकही उद्योग आला नाही. आणखी साडेतीन वर्ष भाजपाच्या हातात आहेत. या कालावधीत खासदार नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यात उद्योग आणल्यास त्यांचा आपण जाहीर सत्कार करू, त्याचबरोबर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, यासाठी आपण जनतेला आवाहन करू. कोटगल उपसा सिंचन योजनेचे काम बंद पडले आहे. तेथील पाईप गोसेखुर्द प्रकल्पासाठी वापरण्यात येत आहे. काँग्रेसच्या कालावधीत कोट्यवधी रूपये खर्च करून महिला रूग्णालय उभारण्यात आले. मात्र सदर रूग्णालय सुरू करण्याची ताकद येथील विद्यमान लोकप्रतिनिधीमध्ये नाही. शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या नावाखाली शासनाने विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबविली आहे. त्यामुळे उच्च शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. पेसा अधिसूचना रद्द करण्याचे आश्वासन भाजपा सरकारने दिले होते. ते आश्वासन त्यांनी पाळावे, अन्यथा लोकप्रतिनिधींना गावबंदी केली जाईल. युवकांच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार वडेट्टीवार यांनी दिला. यावेळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, बंडू शनिवारे, पंकज गुड्डेवार, अ‍ॅड. राम मेश्राम यांच्यासह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: BJP should start the shutdown industry - Vijay Vedettyvar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.