नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का
By Admin | Updated: November 27, 2015 01:36 IST2015-11-27T01:36:42+5:302015-11-27T01:36:42+5:30
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली.

नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का
कोरचीत सेना-भाजप एकत्र : व्हीप जारी केल्यानंतर अहेरीत बदलावा लागला उमेदवार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का लागला आहे. अहेरी वगळता कुठेही भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले नाही. कोरचीत शिवसेना-भाजपची युती नगराध्यक्ष निवडणुकीतही अबाधित राहिली. एटापल्ली, मुलचेरा येथे राकाँचा नगराध्यक्ष विराजमान झाला. तर धानोरा नगर पंचायतीत अपक्षांनी कब्जा केला.
पालकमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या अहेरी राजनगरीत भाजपने मतदानासाठी व्हीप जारी केला असताना व्हीपमध्ये नाव असलेल्या हर्षा ठाकरे यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार यांना उमेदवार करण्यात आले व त्या सर्वानुमते निवडून आल्या. मात्र उमेदवारी बदलण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली. अहेरी येथे नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पेदापल्लीवार यांना १९ सदस्यांनी अविरोध निवडून दिले. नगराध्यक्ष पदासाठी राकाँकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या अर्चना विरगोनवार यांच्यासह राकाँ सदस्यांनीही पेदापल्लीवार यांनाच समर्थन दिले. तर उपाध्यक्ष पदी भाजपच्या अन्नपूर्णा सिडाम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैलेश पटवर्धन यांच्यात लढत झाली. यात अन्नपूर्णा सिडाम यांना नऊ तर पटवर्धन यांना आठ मते मिळाली व अहेरीचा गड राखण्यात भाजपला यश आले. पिठासीन अधिकारी म्हणून एसडीओ दुर्वेश सोनवणे, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी काम पाहिले.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची नगर पंचायतीवर भाजप-शिवसेना युतीने आपला कब्जा कायम ठेवला आहे. या नगर पंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष युती करून लढले होते. येथे शिवसेनेचे नसरूद्दीन भामानी नगराध्यक्ष पदी तर भाजपचे कमलनयन खंडेलवाल हे उपाध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. कोरची येथे शिवसेना-भाजपच्या यांच्या विरोधात काँग्रेस, राकाँ, अपक्ष यांची आघाडी झाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नसरूद्दीन भामानी यांना नऊ तर काँग्रेसचे शामलाल मडावी यांना आठ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे कमलनयन खंडेलवाल यांना नऊ तर अपक्ष हिरा राऊत यांना आठ मते मिळाली.
एटापल्ली येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता प्रसाद राजकोंडावार नगराध्यक्ष पदी तर काँग्रेसचे रमेश गंप्पावार उपाध्यक्ष पदी निवडून आले. राकाँच्या सरिता राजकोंडावार यांना ११ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या निर्मला कोंडभत्तुलवार यांना पाच मते मिळाली. यावेळी आविसच्या अपक्ष नगरसेवक किरण रघुनाथ लेकामी सभागृहात उशीरा पोहोचल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश गंपावार यांनी भाजपचे दीपक सोनटक्के यांचा पराभव केला. गंपावार यांना १० तर सोनटक्के यांना सहा मते मिळाली. अपक्ष नगरसेवक रेखा गजानन मोहुर्ले यांनी सोनटक्के यांच्या बाजुने यावेळी मतदान केले. पिठासीन अधिकारी म्हणून बीडीओ एस. पी. पडघन व तहसीलदार संपत खलाटे यांनी काम पाहिले.
धानोरा येथे ललित बरच्छा गटाच्या वर्षा महेश चिमूरकर या नगराध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी ललित बरच्छा हे निवडून आले आहे. १७ सदस्यीय धानोरा नगर पंचायतीत ललित बरच्छा गटाला नऊ जागा मिळाल्या आहे. गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या वर्षा चिमुरकर यांना १० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या लीना साईनाथ साळवे यांना सात मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ललित बरच्छा यांना १० तर अपक्ष नरेश बोडगेलवार यांना सात मते मिळाली.
मुलचेरा येथे नगराध्यक्ष पदासाठी राकाँचे सुभाष शामराव आत्राम यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पद राकाँचे देवा रामदास चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सुभाष आत्राम यांना ११ तर भाजपचे दिलीप बाबुराव आत्राम यांना तीन मते मिळाली. तीन नगरसेवकांनी मतदान केले नाही. यामध्ये दोन काँग्रेस व एक अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. पिठासीन अधिकारी म्हणून जी. एस. तळपादे यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार अपाले, नायब तहसीलदार पठाण, गिरडकर उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)