जनतेला भाजपच्या खासदार, आमदारांची भाषणे ऐकविणार
By Admin | Updated: August 19, 2015 01:46 IST2015-08-19T01:46:16+5:302015-08-19T01:46:16+5:30
लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीच्या प्रचार काळात गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान खासदार व आमदारांनी

जनतेला भाजपच्या खासदार, आमदारांची भाषणे ऐकविणार
गडचिरोली : लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीच्या प्रचार काळात गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या विद्यमान खासदार व आमदारांनी गैरआदिवासींबाबत अन्यायकारक असलेल्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करण्याचे आश्वासन भाषणातून दिले होते. मात्र आता युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील भाजपच्या खासदार, आमदारांनी पेसा कायद्याच्या अधिसूचनेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करीत निवडणुकीच्या पूर्वी खोटे आश्वासनाचा समावेश असलेले खासदार, आमदारांचे भाषण २६ आॅगस्ट रोजी जिल्हा वर्धापन दिनी जिल्ह्यातील जनतेला ऐकविणार, अशी माहिती विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.
आ. विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी इंदिरा गांधी चौकातील युवक काँग्रेसच्या उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी वडेट्टीवार बोलत होते. याप्रसंगी वडेट्टीवार म्हणाले, पेसा कायद्याची अधिसूचना लागू झाल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी व गैरआदिवासी युवकांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या नोकर भरतीतून गैरआदिवासी पूर्णत: हद्दपार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे खा. अशोक नेते यांनी पेसा कायद्याच्या मुद्यावरून गैरआदिवासींना भाषणातून खोटे आश्वासन दिले. तसेच त्यांनी गैरआदिवासींच्या मुद्यांवर त्यावेळी आक्रमक भूमिका घेतली होती. आ. डॉ. देवराव होळी यांनीही विधानसभा निवडणुकीच्या काळात गैरआदिवासींना न्याय देण्याची भूमिका आपल्या भाषणातून स्पष्ट केली होती. मात्र आता आ. डॉ. होळी यांनी ५० वर्ष पेसा कायद्यात सुधारणा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजप लोकप्रतिनिधींची बदललेली भूमिका जनतेसमोर त्यांनीच दिलेल्या भाषणाच्या सीडीतून मांडणार असल्याचेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष अॅड. राम मेश्राम, पं. स. सभापती देवेंद्र भांडेकर, जि. प. सदस्य गजानन दुग्गा, पंकज गुड्डेवार, बंडू शनिवारे, नंदू वाईलकर, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राह्मणवाडे, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)