पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच झाल्या भाजपच्या मुलाखती

By Admin | Updated: January 17, 2017 00:42 IST2017-01-17T00:42:12+5:302017-01-17T00:42:12+5:30

अहेरी विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे आदिवासी विकास ...

BJP interviews were done in absence of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच झाल्या भाजपच्या मुलाखती

पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीतच झाल्या भाजपच्या मुलाखती

अहेरी विधानसभा क्षेत्र : पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक नेते उपस्थित
अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे आदिवासी विकास व वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या गैरहजेरीतच भारतीय जनता पक्षाला अहेरी येथे सोमवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पाडाव्या लागल्या.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष खासदार अशोक नेते, प्रदेश सदस्य तथा अहेरी विधानसभा प्रमुख बाबुराव कोहळे, सहप्रमुख जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, दामोधर अरगेला, अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, जिल्हा सचिव विनोद आकनपल्लीवार, बाबुराव गंपावार, प्रकाश सावकार गुडेल्लीवार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पक्षाकडून उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहे.
अहेरी येथे एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी या तालुक्यातून जिल्हा परिषदेकरिता ६५ इच्छुकांनी तर पंचायत समितीकरिता १५२ जणांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. भारत खटी यांनी लोकमतशी बोलताना दिली. अहेरी विधानसभा क्षेत्रापासून याची सुरूवात करण्यात आली. पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम या मुलाखतीला उपस्थित राहतील, असे भाजपच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र मुलाखत प्रक्रियेला पालकमंत्र्यांनी दांडी मारली आहे. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर ही अम्ब्रीशराव आत्राम यांची पहिलीच जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक आहे.
यापूर्वी राजे विश्वेश्वरराव महाराज, राजे सत्यवानराव महाराज व दस्तखुर्द अम्ब्रीशराव महाराज यांच्या नेतृत्वात नाग विदर्भ आंदोलन समितीच्या झेंड्याखाली अनेकवेळा जि.प. व पं.स.च्या निवडणुका लढविण्यात आल्या. २०१४ मध्ये अम्ब्रीशराव आत्राम भाजपवासी झाल्यानंतर नाविसंचे सर्व कार्यक्रम अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपच्या बॅनरखाली घेतले जाऊ लागले. त्यामुळे नाविसचे अस्तित्व नाममात्र राहिले आहे. याची खंत नाविसच्या अनेक जुन्या कार्यकर्त्यांना आहे. नाविससोबत अहेरी विधानसभा क्षेत्रातील मुस्लीम, दलित, आदिवासी समाज मोठ्या संख्येने जुळला आहे. भाजपच्या कमळावर लढण्याची मानसिक तयारी अजुनही नाविसच्या कार्यकर्त्यांची झालेली नाही. अम्ब्रीशराव आत्रामही मजबुरीसाठी म्हणून भाजपच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढले. मोदी लाटेत त्यांचा सहज विजय झाला. मात्र त्यांचा जनसंपर्क आमदार झाल्यापासूनच मतदार संघात कमी होत चाललेला आहे, याची खंत त्यांच्या निकटवर्तीयांनाही आहे. मुलाखत प्रक्रियेतील अनुपस्थिती संदर्भात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता, आपण ज्या ग्राहकाला कॉल करीत आहा, त्यांनी फोन बंद करून ठेवला आहे, असा संदेश देण्यात येत होता. त्यामुळे त्यांची बाजू यात घेता आली नाही.

Web Title: BJP interviews were done in absence of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.