भाजप सरकारचे धोरण शेतकरीविरोधी

By Admin | Updated: July 1, 2017 01:33 IST2017-07-01T01:33:16+5:302017-07-01T01:33:16+5:30

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव देण्यात यावा, याकरिता काँग्रेसने अनेक मोर्चे, आंदोलने करून निवेदन सादर केले.

BJP government policy anti-farmer | भाजप सरकारचे धोरण शेतकरीविरोधी

भाजप सरकारचे धोरण शेतकरीविरोधी

कर्जमाफीसाठी अटीच अटी : पत्रकार परिषदेत आनंदराव गेडाम यांचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानाला ३ हजार ५०० रूपये हमीभाव देण्यात यावा, याकरिता काँग्रेसने अनेक मोर्चे, आंदोलने करून निवेदन सादर केले. आंदोलनानंतर शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र कर्जमाफी देताना अनेक जाचक अटी लादून शासनाने शेतकऱ्यांमध्ये भेद निर्माण केला. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही. कर्जमाफीतून भाजप सरकार काहीच साध्य करणार नाही. हे सरकार शेतकरी हितविरोधी आहे, असा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी गुरूवारी आरमोरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला.
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आ. आनंदराव गेडाम म्हणाले, केंद्र व राज्यात सत्तेवर येऊन भाजपला जवळपास तीन वर्षे उलटली. या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी आपल्या जाहीरनाम्यातून शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र या आश्वासनांची एकही पूर्तता शासनाने केली नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्यात यावा. तसेच शेतकऱ्यांंच्या हिताच्या अनेक मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने वारंवार मोर्चे व आंदोलनही करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायला शासनाकडे वेळ नाही. काँग्रेस सत्तेत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले. मात्र भाजप सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. भांडवलदारांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या भाजप सरकारने कोणतेही निकष न लावता मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी शासनाने मोठी दिरंगाई केली. सरसकट कर्जमाफी देताना शासनाने अनेक निकष लादून शेतकऱ्यांमध्ये लहान-मोठा असा भेद निर्माण केला. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची शासनाची मूळातच इच्छा नाही. शेतकऱ्यांमध्ये भेद निर्माण करून शेतकऱ्यांच्या भावना दुखावण्याचे काम शासनाने केला आहे, असा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी केला.
पत्रकार परिषदेला सुभाष सपाटे, मिलींद खोब्रागडे, चंदू वडपल्लीवार, चिंतामन ढवळे उपस्थित होते.

Web Title: BJP government policy anti-farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.