बायोमेट्रिक प्रणाली दर्जा सुधारण्यास आवश्यक
By Admin | Updated: January 13, 2015 22:58 IST2015-01-13T22:58:39+5:302015-01-13T22:58:39+5:30
बायोमेट्रिक प्रणालीच्या व्यवस्थित वापरामुळे आश्रमशाळातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी नियमित राहून चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शासकीय

बायोमेट्रिक प्रणाली दर्जा सुधारण्यास आवश्यक
पी. शिवशंकर यांचा विश्वास : ११ आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये इमारतीचे काम मंजूर
गडचिरोली : बायोमेट्रिक प्रणालीच्या व्यवस्थित वापरामुळे आश्रमशाळातील तसेच वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी नियमित राहून चांगली सेवा देत असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढण्यास निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रभारी प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी व्यक्त केला आहे.
राज्य शासनाच्या ११ नोव्हेंबर २०११ च्या शासन निर्णयानुसार गडचिरोली प्रकल्पातील सर्व शासकीय, अनुदानित व वसतिगृहामधील विद्यार्थ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे बोगस उपस्थिती दाखविणाऱ्यांवर आळा बसला आहे. तसेच शासनाच्या अतिरिक्त होणाऱ्या खर्चाचीही बचत झाली आहे. शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील प्रशासन पारदर्शक व शिस्तीत राहावे, या उद्देशाने गडचिरोली प्रकल्पातून बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीची फलश्रुती चांगली दिसून येत आहे.
आदिवासी विद्यार्थी संघ तसेच आदिवासी विद्यार्थ्यांनी बायोमेट्रिक प्रणालीचा बाऊ करू नये, उलट संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी त्यांचे हित लक्षात घेऊन प्रणालीवर नियमित हजेरी नोंदवून प्रकल्प कार्यालयास सहकार्य करावे, असे आवाहन शिवशंकर यांनी केले आहे. बायोमेट्रिक मशिनच्या व्यवस्थित वापरामुळे देसाईगंज वसतिगृहातील विद्यार्थिनींच्या आहार व निर्वाह भत्त्याचे देयक पूर्णपणे काढण्यात आले आहे. मात्र गडचिरोली येथील वसतिगृहातील बायोमेट्रिक यंत्रणेच्या प्रिंट प्रकल्प कार्यालयास प्राप्त न झाल्याने त्यांचे बिल काढण्याची प्रक्रिया प्रकल्पस्तरावर सुरू आहे.
गडचिरोली प्रकल्पांतर्गत सर्व वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा आॅक्टोबर महिन्यापर्यंतचा निर्वाहभत्ता देण्यात आला असून नोव्हेंबरपासून देयक काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पातील आश्रमशाळांना खेळ साहित्य देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)