बायोगॅस योजनेला घरघर
By Admin | Updated: April 12, 2015 02:14 IST2015-04-12T02:14:02+5:302015-04-12T02:14:02+5:30
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती, जमाती तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविण्यात येते.

बायोगॅस योजनेला घरघर
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत अनुसूचित जाती, जमाती तसेच अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान योजना राबविण्यात येते. मात्र जिल्हा परिषदेच्या २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात पंचायत समितीच्या सेस फंडात निधीची तरतूद करण्यात न आल्याने बायोगॅस प्रोत्साहन योजनेला अखेरची घरघर लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात बाराही पंचायत समित्यांसाठी सेस फंडाची तरतूद करण्यात येते. यामध्ये १२ ते १३ विभागांना विविध योजनेसाठी निधीची तरतूद केली जाते. धानोरा पंचायत समिती अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर प्रतिलाभार्थी चार हजार रूपयांप्रमाणे बायोगॅस प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत नियोजन करण्यात आले होते. मात्र जि. प. च्या २०१५-१६ या वर्षाच्या अंदाजपत्रकात बायोगॅसकरिता एकाही पैशाची तरतूद करण्यात आली नाही. एटापल्ली पंचायत समितीला लाभार्थ्यांना बायोगॅस शेगडी पुरविणे तसेच लाभार्थ्यास अनुदान देण्यासाठी २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात केवळ सात हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अहेरी पंचायत समितीसाठी बायोगॅस संयत्रावर अनुदान देण्यासाठी फक्त २० हजार रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. बायोगॅस प्रोत्साहन योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अंदाजपत्रकात भरघोस निधीची तरतूद करण्यात न आल्यामुळे जिल्ह्यात बायोगॅस योजनेला अखेरची घरघर लागण्याची शक्यता आहे. (स्थानिक प्रतिनिधी)