कोट्यवधी खर्चूनही कचऱ्याचे ढिगारे कायमच
By Admin | Updated: November 20, 2014 22:51 IST2014-11-20T22:51:38+5:302014-11-20T22:51:38+5:30
शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश

कोट्यवधी खर्चूनही कचऱ्याचे ढिगारे कायमच
गडचिरोली : शहर साफसुतरे ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाचे वर्षाकाठी जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्चुनही शहरात जिकडेतिकडे कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळतात. त्याचबरोबर बहुतांश वार्डांमधील नाल्याही गाळाने तुंबलेल्या आहेत. कचरा उचलणे व झाडू मारण्यासाठी २० नियमित कर्मचारी असले तरी ठिकठिकाणी कचरा पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांचे दीड कोटी रूपये कचऱ्यातच जात आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शहराचा व्याप दिवसेंदिवस वाढत चालला असून लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर नगर परिषदेच्यावतीने त्या-त्या भागात नालीचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांची संख्या दरवर्षी वाढतच असून नाली उपसण्याचा खर्चही वाढतच चालला आहे. यावर्षी नगर परिषदेने नाली उपसण्याचे कंत्राटतच दिले असून कंत्राटदाराला महिन्याचे ५ लाख ९६६ रूपये बिल दिल्या जाते. यावर वर्षाचे ६० लाख ११ हजार ५९२ रूपये खर्च होतात. मात्र बहुतांश वार्डांमधील नाल्या सहा महिन्यांपासून उपसल्या नसल्याने सदर नाल्या गाळाने तुंबल्या असल्याचे दिसून येते.
प्रत्येक वार्डात जाऊन घराघरातील कचरा गोळा करण्यासाठी यापूर्वी नगर परिषदेने स्वत:चे मजूर नेमून दिले होते. यावर्षी मात्र घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे कंत्राटही नगर परिषदेने दिले आहे. या सदर कंत्राटदाराला महिन्याचे ३ लाख ८७ हजार ५०० रूपये दिले जातात. वर्षाचे ४४ लाख १० हजार रूपये चुकते केले जातात.
शहरातील मुख्यरस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची झाडझुड करण्यासाठी नगर परिषरदेकडे सुमारे २० कर्मचारी नियमित आहेत. या प्रत्येक कर्मचाऱ्याला १५ हजार रूपयांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. त्यांच्या वेतनावर सरासरी महिन्याचे ३ लाख व वर्षाचे ३६ लाख रूपये खर्च होतात. असे एकूण शहरात स्वच्छता राखण्यासाठी नगर परिषदेचे जवळपास १ कोटी ४० लाख रूपये खर्च होतात.
एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च होऊनही शहरात मात्र प्रत्येक वार्डात कचऱ्याचे ढिगारे बघावयास मिळतात. शहरात ठेवण्यात आलेल्या कंटेनर संपूर्ण भरून त्यातील कचरा खाली पडलेला दिसून येतो. त्यावर डुकरे दिवसभर लोळत असल्याने त्रस्त झालेले नागरिक नाईलाजास्तव कंटेनरलाच आग लावतात. एवढा खर्च होऊनही शहरात अस्वच्छता असल्याने नगर परिषदेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. (नगर प्रतिनिधी)