अपघात ही देशासमोरील मोठी समस्या
By Admin | Updated: January 12, 2016 01:24 IST2016-01-12T01:24:22+5:302016-01-12T01:24:22+5:30
वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

अपघात ही देशासमोरील मोठी समस्या
महेश आव्हाड यांचे प्रतिपादन : रस्ता सुरक्षा अभियानाचा गडचिरोलीत शुभारंभ
गडचिरोली : वाढती वाहनांची संख्या व वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे केले जाणारे उल्लंघन यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट कोसळते. हे संकट टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन करावे, अपघातामुळे दर दिवशी ३७० नागरिक मरण पावतात. २०१३ मध्ये देशभरातील अपघातांमध्ये १ लाख ३७ हजार नागरिक मृत्युमुखी पडले. युद्ध, आतंकवादी हल्ले यांच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने नागरिक अपघातामध्ये मृत्यू पावले आहेत. त्यामुळे अपघात ही देशासमोरील सर्वात मोठी समस्या बनली आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले.
जिल्हा सुरक्षा समिती, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गडचिरोली व शहर वाहतूक पोलीस शाखा गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक इंदिरा गांधी चौकातील सभागृहात रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारागृह अधीक्षक डॉ. बी. एन. ढोले, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शांताराम फासे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, प्राचार्य संजय भांडारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंजूनाथ सिंगे यांनी बहुतांश अपघात निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने घडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहन चालविताना प्रत्येक चालकाने वाहतूक नियमांचे पालन केलेच पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविकादरम्यान सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी फासे यांनी दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यात १० ते १२ हजार वाहनांची भर पडत आहे. प्रत्येक १० व्यक्तीमागे एक वाहन आहे. वाहनांची संख्या वाढत चालल्याने देशात प्रत्येक मिनिटाला एक अपघात घडतो. हे टाळण्यासाठी प्रत्येकाने स्वत:चे कर्तव्य मानून वाहतूक नियमांचे पालन केले पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाप्रसंगी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका व वाहतूक नियमांविषयी असलेल्या पत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन निरीक्षक नीलेश बन्सोड यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रशांत इंगवले, नितीन सूर्यवंशी, हर्षल बदन, मेश्राम, नीलेश उराडे, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक अमृता राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीसांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)