राष्ट्रीय महामार्गाचे लवकरच भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2015 01:21 IST2015-11-23T01:21:21+5:302015-11-23T01:21:21+5:30
साकोली-देसाईगंज- गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग वर्षभरापूर्वी घोषित करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गाचे लवकरच भूमिपूजन
सर्वेक्षण अंतिम टप्प्यात पोहोचले : साकोली-देसाईगंज-सिरोंचा मार्ग
देसाईगंज : साकोली-देसाईगंज- गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-रेपनपल्ली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग वर्षभरापूर्वी घोषित करण्यात आला. आता या राष्ट्रीय महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून या राष्ट्रीय महामार्गाचा डीपीआर तयार करून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, सदर राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गामध्ये हस्तांतरीत केल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे. या महामार्गाच्या कामाचे भूमिपूजन लवकरच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मंजुरी मिळालेल्या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन डिसेंबर महिन्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सदर मार्ग निर्मितीमुळे परिसरातील दळणवळण, उद्योगधंदे व विकासाला चालणा मिळणार आहे. साकोली-वडसा-चंद्रपूर राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. सदर महामार्गाची शहरी भागातून १६० फूट रूंदी राहणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. साकोली - देसाईगंज -गडचिरोली - सिरोंचा या महामार्गाच्या निर्मितीसाठी सर्वेक्षण, माती परीक्षण, नदी, नाल्यांवरील पुलांची संख्या, जंगलातील तोडावयाची वृक्षांची संख्या याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. गत वर्षभरापासून या प्रकल्पाचा डीपीआर तयार होत आहे. सदर अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सादर केल्यानंतर या महामार्गाला अंतिम मंजुरी मिळणार असून निविदा प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज शहराला छेदून गेलेला राज्य महामार्ग यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित होता. सदर राज्य महामार्ग आता राष्ट्रीय महामार्गाला हस्तांतरीत झाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळाली आहे. या मार्गाच्या निर्मितीमुळे नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)