भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदांमुळे खिळखिळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:59 IST2021-05-05T04:59:40+5:302021-05-05T04:59:40+5:30

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तब्बल तीन वर्षांपासून फार्मासिस्ट व क्लर्कचे पद रिक्त आहे, तसेच येथे ...

Bhendala Primary Health Center vacancies | भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदांमुळे खिळखिळे

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र रिक्त पदांमुळे खिळखिळे

भेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तब्बल तीन वर्षांपासून फार्मासिस्ट व क्लर्कचे पद रिक्त आहे, तसेच येथे गेल्या काही दिवसांपासून मास्क, हातमोजे, सॅनिटायझरचा तुटवडा आहे. त्यामुळे हातमोज्यांशिवाय आराेग्य कर्मचाऱ्यांना नागरिकांचे लसीकरण करावे लागत आहे. साहित्य नसताना रुग्णांवर उपचार कसा करावा, असा प्रश्न परिचारिकांना पडला आहे. त्यामुळे कर्मचारी स्वखर्चाने हातमोजे, मास्क बाहेरून खरेदी करून लसीकरण करीत असल्याचे चित्र आहे.

भेंडाळा प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत परिसरातील अनेक गावे येतात. त्यामुळे येथे बरीच गर्दी दिसून येते. सध्या काेराेनाचे संकट आहे. अशातच येथे कर्मचारी वापरत असलेल्या वस्तुंचा तुटवडा आहे. वस्तुंच्या तुटवड्यामुळे लसीकरण करण्यासाठी आलेल्या वृद्ध नागरिकांना भरपूर वेळ प्राथमिक आरोग्य केंद्रामधे बसून राहावे लागते. परिणामी, या ठिकाणी मोठी गर्दी हाेऊन शारीरिक अंतर राखण्याचा पुरता फज्जा उडालेला दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मास्क, हातमोजे आदींचा तुटवडा आहे, ही बाब वैद्यकीय अधिकाऱ्याला सांगितली आहे, तरीही आवश्यक वस्तू उपलब्धेकडे दुर्लक्ष हाेत आहे, असे आराेग्य कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. आराेग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे अधिक कामाचा ताण आराेग्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकर भरावी, तसेच अत्यावश्यक असलेले साहित्य आरोग्य केंद्रात उपलब्ध करावे, अशी मागणी भेंडाळा परिसरातील नागरिकांनी केली आहे. भेंडाळा आरोग्य केंद्रात आतापर्यंत दोन हजारांच्या जवळपास नागरिकांचे लसीकरण झाले आहे.

बाॅक्स

गावातील मुली करतात परिचारिकांचे काम

भेंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही परिचारिका कोरोनाबाधित निघाल्याने, त्यांचे काम गावातीलच नर्सिंग कोर्स केलेल्या मुली विनावेतन काम करीत आहेत, तसेच या केंद्रामधे मागील तीन वर्षांपासून फार्मासिस्ट, तसेच क्लर्कचे पद रिक्त असल्याने गोळ्या-औषध वाटप करण्याचे काम प्राथमिक आरोग्य केंद्रातील मलेरिया वर्कर, नर्स यासारखे कर्मचारी करीत असल्याचे दिसून येत आहे, तसेच कार्यालयीन कामही काही कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकारी करीत असतात. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना जे काम करायचे आहे, ते काम मागे पडत असून, त्यांना गोळ्या वाटप करणे व इतर कार्यालयीन कामे करावी लागत आहेत.

Web Title: Bhendala Primary Health Center vacancies