आॅगस्टमध्ये होणार रेल्वेमार्गाचे भूमिपूजन
By Admin | Updated: May 6, 2016 01:12 IST2016-05-06T01:12:21+5:302016-05-06T01:12:21+5:30
आॅगस्ट २०१६ मध्ये वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार अशोक नेते यांना दिली आहे.

आॅगस्टमध्ये होणार रेल्वेमार्गाचे भूमिपूजन
खासदारांची रेल्वे मंत्र्यांशी दिल्लीत बैठक : वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाला केंद्र सरकार प्राधान्य देणार
गडचिरोली : आॅगस्ट २०१६ मध्ये वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचे भूमीपूजन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी खासदार अशोक नेते यांना दिली आहे. गुरूवारी खासदार अशोक नेते यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली, त्यावेळी वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासंदर्भात दीर्घ चर्चा झाली. नामदार प्रभू यांनी तत्काळ कार्यकारी संचालक (बांधकाम) मोहित मिश्रा व कार्यकारी संचालक (आरआरबी) यांना सविस्तर माहिती देऊन निवेदन देण्याचे निर्देश दिले. वडसा-गडचिरोली रेल्वेलाईन व छत्तीसगडमधील रेल्वे प्रकल्प हे केंद्र सरकारच्या शिर्षस्थ स्थानी असून त्यांची कामे प्रगतीपथावर आहे. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाचा प्रकल्प हा नक्षलग्रस्त भागातील असल्याने केंद्र शासनाच्या गृहमंत्रालयाकडे भागिदारीसाठी मागणी करण्यात आली होती. हा प्रश्न केवळ आर्थिक भागिदारीचा नाही. गृहमंत्रालय अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये सहभागी होत नाही. त्यांचे कार्य सुरक्षा देण्यापर्यंत मर्यादित असल्याचे कार्यकारी संचालकांनी या बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांच्याकडे स्पष्ट केले. मागील १५ वर्षांपासून हा प्रकल्प प्रलंबित असून येत्या आॅगस्ट महिन्यात या प्रकल्पाचे भूमीपूजन केले जाईल, असेही ठोस आश्वासन सुरेश प्रभू यांनी खासदार नेते यांना दिले. तसेच गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून जाणारा नागभिड-नागपूर नॅरोगेज ब्रॉडगेजमध्ये रूपांतरीत करण्याला केंद्र शासनाने मंजुरी दिली आहे. २३ एप्रिल २०१६ रोजी नागपूर येथे झालेल्या बैठकीत या मार्गाच्या बांधकामासाठी निधी खर्च करण्याला निधी आयोगाची मंजुरी नसल्याने काम अजुनही सुरू झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर्षीच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रूपयांची तरतूद या मार्गासाठी करण्यात आली. निधी आयोगाने तत्काळ मंजुरी दिल्यास या मार्गाचेही काम सुरू करू, असे आश्वासन सुरेश प्रभू यांनी खासदार नेते यांना दिले. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचा प्रस्ताव गृहमंत्रालयाने फेटाळल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर खासदार नेते यांनी रेल्वेमंत्र्यांची तत्काळ भेट घेतली.