ग्रामस्थांनी भगवानपूर जि.प. शाळेला ठोकले कुलूप
By Admin | Updated: July 26, 2016 01:18 IST2016-07-26T01:18:34+5:302016-07-26T01:18:34+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत भगवानपूरवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शाळेला सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुलूप ठोकले.

ग्रामस्थांनी भगवानपूर जि.प. शाळेला ठोकले कुलूप
दोन शिक्षक द्या : पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चार तासात शाळा सुरू
कुरखेडा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत भगवानपूरवासीयांनी शिक्षकांच्या मागणीसाठी येथील जिल्हा परिषद शाळेला सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास कुलूप ठोकले. मात्र पंचायत समिती पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने चार तासात कुलूप उघडून शाळा सुरू करण्यात आली.
भगवानपूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग असून येथील विद्यार्थी पटसंख्या ७४ आहे. मात्र या सात वर्गातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी येथे केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. गावकरी व पालकांनी पंचायत समिती प्रशासनाने या शाळेमध्ये आणखी दोन शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी अनेकदा केली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागणीची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या मुद्यावर सोमवारी संतप्त नागरिकांनी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद पाडली.
ग्रामस्थांनी कुलूप ठोकून शाळा बंद पाडल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाला मिळताच कुरखेडा पं.स.चे उपसभापती बबन बुध्दे, पं.स. सदस्य प्रभाकर तुलावी, शिक्षण विस्तार अधिकारी वाघाडे यांनी तत्काळ भगवानपूर येथील शाळेला भेट दिली. संतप्त ग्रामस्थ व पालकांशी चर्चा करून कढोली जि.प. शाळेतील शिक्षक ए. बी. सायकार यांची सदर शाळेत तत्काळ नियुक्ती करण्यात येईल. याशिवाय येत्या तीन दिवसात भगवानपूर जि.प. शाळेला एक शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर संतप्त पालकांनी आंदोलन मागे घेतले. (तालुका प्रतिनिधी)