अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

By Admin | Updated: February 28, 2017 00:48 IST2017-02-28T00:48:45+5:302017-02-28T00:48:45+5:30

गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती.

Bharatiya BJP has emerged for the first time | अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

अहेरीत भाजप पहिल्यांदाच वाढली

चार जागा मिळाल्या : अम्ब्रीशराव आत्राम यांच्या परिश्रमाचे फळ
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात अहेरी विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकद १० हजार मतांच्या आतच होती. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका भाजप केवळ दखलपात्र ठरण्यासाठी येथे उमेदवार उभे केले जात होते. मात्र यशाची कुठलीही अपेक्षा न बाळगता हा कार्यक्रम राबविला जात होता. भाजपचे दिवंगत नेते जोगाजी मडावी, बाजीराव कुुमरे हे अनेकवेळा विधानसभेच्या निवडणुका लढले. मात्र त्यांच्या यश पदरात आले नाही.
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या भागात भाजपची ताकद वाढली. अम्ब्रीशराव स्वत: भाजपच्या कमळावर विधानसभेत पोहोचले व या भागात नाविस व भाजपचे जुने कार्यकर्ते असे संयुक्त काम सुरू झाले. त्यामुळे भाजपला आता २८ हजार मतांपर्यंत मजल मारता आली. म्हणजे जवळजवळ १८ हजारांवर मतांची भर भाजपच्या खात्यात नव्याने जमा झाली आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे कुठे नव्हे एवढे मुद्दे एकट्या अहेरी विधानसभा क्षेत्रात विरोधकांनी जि. प. च्या रणसंग्रामात उपस्थित केले. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यात शेतकऱ्यांचा असंतोष, सूरजागड प्रकल्पावरून स्थानिकांचा भाजपवर असलेला रोष शिवाय सिरोंचाच्या रेती तस्करीला भाजपच जबाबदार आहे, हा प्रचार भाजपासाठी प्रचंड फटका देणारा ठरला.
केंद्र सरकारच्या नोटबंदीमुळे खवळलेल्या माओवाद्यांनी भाजपच्या विरोधातच प्रचार ठोकला. याचा परिणाम दुर्गम भागात भाजप उमेदवारांवर झाला. या परिस्थितीतही अम्ब्रीशराव आत्रामांच्या एकट्याच्या बळावर भाजपचा किल्ला त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्रात टिकविला व पक्षाच्या जागा दोनवरून चारवर नेल्या. स्वत: राणी रूक्मिणीदेवीही भाजपच्या प्रचारासाठी अहेरी विधानसभा क्षेत्रात अनेक भागात फिरल्या. त्यांच्या प्रचारामुळेच कोेठारी-शांतीग्रामची जागा नाविसचे जुने कार्यकर्ते असलेले उरेते परिवार राखू शकले.
टीकाकार ही बाब मान्य करण्यास तयार नाही. अम्ब्रीशरावांवर निष्क्रीयतेचा ठपका ठेवत भाजपला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाल्याचा डंका ते पिटवत आहे. भाजपने मेडिगट्टा-कालेश्वर प्रकल्पाबाबत वेळोवेळी स्पष्टीकरण दिले. मात्र आविसंने या भागात केलेले आंदोलन प्रभावी झाल्याने सिरोंचा तालुक्यात टेबल वाजला.
भामरागड तालुक्यात भाजपचा प्रभाव फारसा दिसला नाही. मात्र पेरमिली-राजाराम हा नाविसचा गड या निवडणुकीतही अम्ब्रीशराव राखून धरू शकले. हे तेवढेच महत्त्वाचे आहे. मात्र या निवडणुकीतून धडा घेऊन पालकमंत्र्यांनी अहेरीसाठी आता स्वतंत्र वेळ देणे महत्त्वाचा राहणार आहे. लोकांचा संपर्कही वाढविण्याची गरज आहे. दिवसा जरी शक्य झाले नाही, तरी रात्री कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावनाही समजून घेणेही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक राहणार आहे, एवढाच संदेश मतदारांनी अम्ब्रीशरांवाना या निकालातून दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Bharatiya BJP has emerged for the first time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.