भामरागड तालुका समस्यांच्या विळख्यात
By Admin | Updated: May 11, 2017 01:54 IST2017-05-11T01:54:51+5:302017-05-11T01:54:51+5:30
तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची

भामरागड तालुका समस्यांच्या विळख्यात
आरोग्य व्यवस्था बळकट करा : लालसू नोगोटी यांचे जि.प. सीईओंना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी जि. प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी यांनी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मंगळवारी अॅड. लालसू नोगोटी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांची भेट घेऊन आरोग्यविषयक समस्यांबाबत दीर्घ चर्चा केली. अॅड.नोगोटी यांनी सांगितले की, भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. जामी यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तत्काळ भरा, अन्यथा रुग्णालयाला कुलूप ठोकू, असा इशारा नागरिकांनी आंदोलनाद्वारे दिला होता. आंदोलनानंतर मन्नेराजाराम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. भूषण चौधरी व एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयातील डॉ. वानखेडे यांना भामरागड येथे तात्पुरत्या स्वरुपात रुजू करुन घेण्यात आले. परंतु मूळ मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे अॅड. नोगोटी यांनी गोयल यांच्या निदर्शनास आणून दिले.
भामरागड तालुक्यात एकूण ५ मानसेवी वैद्यकीय अधिकारी आहेत. परंतु ते मुख्यालयी न राहता प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणीच राहतात. अनेक गावे दुर्गम असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नितांत आवश्यकता आहे. ही गरज लक्षात घेता आणख्ी ५ मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी अॅड.नोगोटी यांनी केली. यावर गोयल यांनी सकारात्मक आश्वासन दिले.