भामरागडात ‘रास्ता रोको’ आंदोलन
By Admin | Updated: November 2, 2015 01:09 IST2015-11-02T01:09:42+5:302015-11-02T01:09:42+5:30
राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी भामरागड येथील ...

भामरागडात ‘रास्ता रोको’ आंदोलन
प्रमुख मागण्यांकडे वेधले लक्ष : जनहितवादी युवा समितीचा पुढाकार
भामरागड : राष्ट्रीय जनहितवादी युवा समिती व अहेरी जिल्हा कृती समिती एटापल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी भामरागड येथील बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करून तालुक्यातील समस्या सोडविण्याची मागणी केली.
सूरजागड येथील लोहखनिजाचे उत्खनन करण्यासाठी सूरजागडपर्यंत चारपदरी रस्ता तयार करण्यात येत आहे. परंतु यासाठी ग्राम पंचायतींना विचारात घेतले नाही. भामरागड व एटापल्ली तालुक्यातील सिंचन, आरोग्य, वीज, रस्ते आदी समस्या सर्वप्रथम सोडविण्यात याव्या, बांडे, पर्लकोटा, पामुलगौतम नदीवर धरणे बांधून सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी, कसनसूर, जारावंडी, पेंढरी, गट्टा, ताडगाव, जिमलगट्टा या तालुक्यांची निर्मिती करावी, भामरागड तालुक्यातील शेकडो नागरिकांना अजूनही पट्ट्यांचे वाटप करण्यात आले नाही. हे काम करण्यास प्रशासनाने प्राधान्य द्यावे आदी मागण्यासांठी जनहितवादी युवा समितीच्या नेतृत्वात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली. मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने समस्या कायम आहेत. त्यामुळे शनिवारी जनहितवादी युवा समितीच्या वतीने भामरागड येथील बसस्थानक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे जवळपास दोन तास वाहतूक खंडित झाली होती. त्यानंतर तहसीलदारांच्या मार्फतीने राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जनहितवादी युवा समिती एटापल्लीचे संयोक सुरेश बारसागडे, जनहितवादी युवा समितीचे सहसचिव पायल परसा, अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे सहसचिव राणू गोटा, रामदास नरोटे यांच्यासह जनहितवादी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी केले. आंदोलनात तालुक्यातील शकडो शेतकरी, मजूर, महिला, बेरोजगार युवक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)