भामरागडात गंमत जत्रेला प्रारंभ
By Admin | Updated: December 25, 2016 01:46 IST2016-12-25T01:46:47+5:302016-12-25T01:46:47+5:30
ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर उपाख्य बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. २३ डिसेंबर १९७३ ला

भामरागडात गंमत जत्रेला प्रारंभ
चार दिवस कार्यक्रमांची मांदियाळी : प्रकाश व मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते थाटात शुभारंभ
भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक मुरलीधर उपाख्य बाबा आमटे यांनी १९७३ मध्ये लोक बिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. २३ डिसेंबर १९७३ ला या प्रकल्पाची स्थापना झाली. या प्रकल्पाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत हेमलकसा स्थित लोकबिरादरी प्रकल्पात गंमत जत्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात लोकबिरादरी प्रकल्पाच्या आश्रमशाळेचे विद्यार्थी सहभागी झाले आहे. २३ डिसेंबर हा लोकबिरादरी प्रकल्पाचा वर्धापन दिन आहे. २४ डिसेंबर हा डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर २५ डिसेंबर डॉ. मंदाकिनी आमटे यांचा जन्मदिवस आहे. २६ डिसेंबर हा डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्मदिवस व बाबा आमटे यांची जयंती आहे, असा दुर्धर योगायोग साधून लोकबिरादरी प्रकल्पात चार दिवस विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २३ डिसेंबर रोजी शुक्रवारी लोकबिरादरीला ४३ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व प्रथम स्व. बाबा आमटे व स्व. साधना आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक गंमत जत्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक गोपाळ फडणीस, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे, शेतकरी सिताराम मडावी, डॉ. भारती बोगामी, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वर्धापन दिनाचे औचित्य साधून लोकबिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या शैक्षणिक गंमत जत्रा या उपक्रमांतर्गत सन २०१६ मधील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध घटनांच्या प्रकल्पांची मान्यवरांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सदर उपक्रम दोन दिवस सुरू राहणार आहे. लोक बिरादरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम दोन दिवस चालणार आहे. चार दिवशीय विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी समिक्षा आमटे यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ. विलास तळवेकर, मुख्याध्यापक शरीफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी सहकार्य करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)